Tue, May 21, 2019 22:29होमपेज › Satara › कराडात मुस्लिम महिलांचा मोर्चा

कराडात मुस्लिम महिलांचा मोर्चा

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:21PMकराड : प्रतिनिधी

केंद्र सरकारने तयार केलेल्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात शुक्रवारी दुपारी शहर व परिसरातील हजारो मुस्लिम महिलांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व जमियत ए उलेमा हिंद कराड यांच्या संयुक्‍त विद्यमाने या मोर्चाचे आयोजन केले होते. तहसीलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले. जमियत उलमा ए हिंदचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवही उपस्थित होते.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता रेव्हिन्यू क्लबनजीकच्या मक्‍का मस्जिदपासून या मोेर्चास प्रारंभ झाला. मुस्लीम समाजातील महिला, तरूणी, विद्यार्थिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तलाक विधेयक रद्द करा, शरियतमध्ये हस्तक्षेप करू नका, अशा आशयाचे विविध फलक महिलांच्या हाती होते. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर तहसीलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा मोर्चा मक्‍का मस्जिदमध्ये आला. तेथे दुवा होऊन मोर्चाची सांगता झाली. 

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधनाने मुस्लिमांना मुस्लीम पर्सनल कायद्यांतर्गत आपले कौटुंबिक जीवन इस्लामी शरियतनुसार जगण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. परंतु केंद्र सरकारने जे तिहेरी तलाक विधेयक तयार केले आहे, ते इस्लामी शरियतच्या पूर्ण विरोधात आहे. महिला स्वातंत्र्यांच्या नावाखाली मुस्लीम कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणार आहे. केंद्र सरकारने मुस्लिम पर्सनल लॉ, इस्लामी कायदेतज्ज्ञ, उलेमा, मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी यांच्याशी कोणतीही चर्चा न करता घाई गडबडीत हे विधेयक लोकसभेत सादर केले. 

लग्‍न व तलाक याला फौजदारी स्वरूप देण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे तोंडी तलाकच मान्य नाही, तर तलाक दिला म्हणून पुरूषाला तीन वर्षे शिक्षा कशी करता येईल? शिक्षा दिली तर पत्नी व मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोणाची ? तुरूंगातून आल्यानंतर संसारात निर्माण होणार्‍या अडचणी होणार आहेत. त्यामुळे तिहेरी तलाक विधेयक रद्द करावे, शरियतमध्ये हस्तक्षेप करू नये, मागणी करण्यात आली आहे. मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात करण्यात आला होता.