Fri, Apr 26, 2019 04:12होमपेज › Satara › कचर्‍यापासून पालिकेच्या उत्पन्नात भर

कचर्‍यापासून पालिकेच्या उत्पन्नात भर

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:14PMकराड : प्रतिभा राजे 

गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून येथील बारा डबरी भागामध्ये कंपोस्ट पीठ तयार करण्यात आले.यामध्ये कचर्‍याचे विलगीकरण करून कचर्‍यापासून खत निर्मितीस प्रारंभ करण्यात आला. ओल्या  व सुक्या कचर्‍यापासून खत निर्मिती करत असतानाच हे खत शेतकर्‍यांना विकत दिले जाते तसेच कचर्‍यामध्ये असणारे प्लास्टिक संबंधित कंपन्यांना देऊन त्यामधून पालिकेला हजारो रूपयांचा लाभ होवून पालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. 

दररोज शहरातून जमा होणारा कचर्‍याचे विलगीकरण करून कचरा चाळला जातो. त्यातील प्लास्टिक बाजूला करून पुन्हा कचरा बारीक चाळणीतून चाळला जातो. त्यापासून निघणार्‍या खताची पोती भरून ठेवली जातात. शेतकर्‍यांना आवश्यकतेनुसार 5 रू. प्रमाणे किलो व 5 रू. प्रमाणे किलो प्लास्टिक कंपन्यांना दिले जाते. 

आठवडाभरातून किमान 3 ते 4 टन प्लास्टिक जमा केले जाते. यापासून मिळालेले उत्पन्नामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडत आहे. बारा डबरी येथे कचरा वेचक सुमारे 40 महिला काम करत आहेत. त्यांना पालिकेकडून अ‍ॅप्रन, हॅण्डग्लोज दिले आहेत. 

कचरा हाताने ग्राईंड करण्यापेक्षा यासाठी ग्राईंडर बसवण्याच्या विचारात पालिका असल्याचे नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी सांगितले. यामुळे खताचा दर्जा वाढणार असून कामही त्वरीत होणार आहे. शिवाय चाळून उरलेला कचरा टाकण्यापेक्षा संपूर्ण कचरा उत्तमरित्या चाळला जाणार आहे. पालिकेकडून नुकतेच 1 कोटी 87 लाख रूपयांचे टेंडर काढले आहे. याद्वारे एकाच व्यक्‍तिकडे नियंत्रणाची जबाबदारी देण्यात येणार असून 22 घंटागाड्यांतून येणार्‍या कचर्‍यावर फवारणी करणे, कचरा विलगीकरणाची कामे देण्यात येणार आहेत. तसेच कचर्‍याचे 

बायोमायनिंग मशिनद्वारे करण्यात येणार तर त्याच मशिनमध्ये कचर्‍याचे गठ्ठे तयार करण्यात येणार आहेत. हे गठ्ठे सिमेंट कारखान्यांना देण्यात येणार आहेत. तसेच कचर्‍याचे काम ज्याठिकाणी सुरू असणार आहे त्याठिकाणी ब्रिझ तयार करण्यात येणार असून या ब्रिझवरून कचरा गाडी शेड मध्ये लावून विंडो कंपोस्टिंगमध्ये नेली जाणार आहे.  आधुनिक पध्दतीने कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.