Thu, Nov 22, 2018 16:06



होमपेज › Satara › कराड : मलकापूरच्या निवडणूक प्रक्रियेस उच्च न्यायालयाकडून स्थगिती

कराड : मलकापूरच्या निवडणूक प्रक्रियेस उच्च न्यायालयाकडून स्थगिती

Published On: Jun 18 2018 3:30PM | Last Updated: Jun 18 2018 3:30PM



कराड : प्रतिनिधी 

मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नगरपंचायतीची नगरपालिका करण्याबाबत १५ दिवसांची मुदत देत याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचनाही न्यायालयाने राज्य प्रशासनाला केली.  त्यामुळेच आता राज्य प्रशासन  निर्णय घेणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी, यासाठी नारायण रैनाक यांच्यासह त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी २४ मार्चला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने राज्य शासनाला १५ दिवसांची मुदत देत अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. 

मलकापूर नगरपंचायतीची लोकसंख्या २५ हजाराहून अधिक आहे. नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी, यासाठी गेल्यावर्षी नगरपंचायतीने ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवालही सादर केला होता. तसेच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रधान सचिवांना याबाबतचा अहवाल सादर केला आहे. तसेच प्रधान सचिवांनीही मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. मलकापूर नगरपालिका झाल्यास आवश्यक कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधही प्रशासनाने मंजूर केला आहे. तसेच मलकापूर नगरपंचायतीनंतर ज्या - ज्या नगरपंचायतींनी नगरपालिका व्हावी यासाठी दिलेल्या प्रस्तावांना प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र केवळ राजकीय हेतूने विरोध होऊन मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका होऊ शकलेली नाही, असा युक्तीवाद अँड. प्रताप दाणी व अँड. उमेश माणकापुरे यांनी मलकापूर नगरपंचायतीची बाजू मांडताना उच्च न्यायालयात केला.

दरम्यान, यापूर्वी सत्ताधारी व विरोधी गटाकडून याप्रकरणी परस्पर विरोधी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळेच आता प्रशासन कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.