Tue, Apr 23, 2019 21:51होमपेज › Satara › एसपी संदीप पाटील यांच्यासाठी आंदोलन

एसपी संदीप पाटील यांच्यासाठी आंदोलन

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:16PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली रद्द व्हावी, यासाठी रविवारी सकाळी 11 ते 1 या कालावधीत विविध सामाजिक संघटनांनी पोलिस मुख्यालयासमोरील शांतीदूत पुतळ्यासमोर मूक आंदोलन केले. पोलिस अधिकार्‍यांनी समस्त सातारकरांच्या भावना वरिष्ठ कार्यालयाला कळवल्या जातील, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन थांबवले. दरम्यान, सातारचे शांतीदूत एसपी संदीप पाटील यांनी रविवारी सकाळीच पुणे ग्रामीणचा चार्ज स्वीकारला.

सातारचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली. शनिवारी सकाळी हे वृत्त पसरल्यानंतर सातार्‍यात दिवसभर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर एसपी संदीप पाटील यांची बदली रद्द व्हावी व आणखी एक वर्ष मुदतवाढ मिळावी, अशी मोहीम सुरु झाली. एसपींची बदली रद्द होण्यासाठी नावांची मोहीमही सोशल मीडियावर सुरु होती. 

सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तर रविवारी शांतीदूत पुतळ्यासमोर सर्व सातारकरांना एकत्र येण्याचे आवाहन करुन एसपी संदीप पाटील यांची बदली रद्द होण्यासाठी मूक आंदोलनाचे आवाहन केले. रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून पोलिस मुख्यालय परिसरात हळूहळू नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. गर्दी झाल्यानंतर शांतीदूतासमोर बसून प्रत्यक्ष मूक आंदोलनाला सुरुवातही झाली. सामाजिक, राजकीय, संघटना, युवक, महिला यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला. यावेळी उपस्थित प्रत्येकांनी एसपी संदीप पाटील यांच्या यशस्वी कार्यपद्धतीबाबत मनोगत व्यक्‍त करुन शासनाने त्यांना सातार्‍यात आणखी एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली.  आंदोलनादरम्यान गर्दी वाढत गेल्याने पोनि पद्माकर घटवट व पोनि नारायण सारंगकर यांनी तेथे येवून सर्व आंदोलकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली.

सातारकरांच्या भावना शासनाला कळवल्या जातील. आता आंदोलन थांबवावे, अशी विनंती पोलिस अधिकार्‍यांनी केल्यानंतर आंदोलकांनीही आंदोलन थांबवून शासनाने लवकारात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी लावून धरली.

या आंदोलनामध्ये सुशांत मोरे, मधुकर शेंबडे, राजू गोडसे, सतीश ओतारी, सागर भोगावकर, विजय बडेकर, शंकर माळवदे, राम हादगे, नासिर शेख, राजू कांबळे, बाळासाहेब शिंदे, सचिन सावंत, अभिजीत बारटक्के, नारायण पाटील, अंजली कुलकर्णी यांच्यासह सुमारे 50 हून अधिक जणांनी सहभाग घेतला. यावेळी प्रसिध्दी माध्यमातील सर्वच प्रतिनिधीही उपस्थित होते.

सातारचा शांतीदूत पुणे ग्रामीणला विसावला..

एसपी संदीप पाटील यांची बदली झाल्यानंतर शनिवारी दिवसभर त्यांची बदली रद्द होण्यासाठी सातारकरांच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत होत्या. अशातच शनिवारी रात्री त्यांना पुणे ग्रामीणचा चार्ज घेण्याचे आदेश मिळाले. यामुळे चार्ज स्वीकारण्यासाठी रविवारी एसपी संदीप पाटील पहाटे सहा वाजताच  पुण्याकडे निघाले. यावेळी पोलिस दलातील शिरवळचे पोनि भाऊसाहेब पाटील यांच्यासह अनेकांनी महामार्गावरच त्यांना अलविदाही केला. दरम्यान, अचानक एसपी संदीप पाटील पुणे ग्रामीण हजर होण्यासाठी गेल्याचे वृत्त आंदोलनावेळी पसरल्यानंतरही आंदोलकांनी आंदोलन न थांबवता ते सुरुच ठेवले व उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.