Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › वृक्षतोडीविरोधात रिपाइंचे ‘दशक्रियाविधी’ आंदोलन

वृक्षतोडीविरोधात रिपाइंचे ‘दशक्रियाविधी’ आंदोलन

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:18PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध कारणांनी वृक्षतोड होत आहे. सातारा शहर परिसरात वृक्षांवर कुर्‍हाड चालवली जात आहे. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्यावर प्रशासन टाळाटाळ करते. वृक्षतोड  करणार्‍यांवर गंभीर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून 5 वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी निश्‍चित करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जिल्हा प्रशासनाविरोधात दशक्रियाविधी आंदोलन केले.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातार्‍यात आयटीआयजवळ करण्यात आलेल्या वृक्षतोडीप्रकरणी संबंधितांवर वृक्ष कायद्यानुसार गुन्हे दाखल करणे अपेक्षित असताना वृक्षचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. झाडे तोडणार्‍या गोडोलीतील धनदांडग्यावर कारवाई झाली नाही. म्हसवे गावच्या हद्दीत नदीकाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु असूनही दुर्लक्ष केले जात आहे.

वीज वाहिन्यांच्या अडथळ्यांच्या नावाखाली  झाडे छाटली जात आहेत. याबाबत संबंधित विभागांकडे तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास संबंधित अधिकार्‍यांच्या निवासस्थानासमोर वृक्ष लागवड मोहीम हाती घेवून तीव्र आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मुस्लिम अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष फाखभाई पटणी, आयेश पटणी, साईनाथ खंडागळे आदि उपस्थित होते.