Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Satara › एफआरपीप्रमाणे दर न देणार्‍या कारखान्यांविरोधात आंदोलन : तुपकर

एफआरपीप्रमाणे दर न देणार्‍या कारखान्यांविरोधात आंदोलन : तुपकर

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 11:36PMसातारा : प्रतिनिधी

भाजप सरकारने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला आहे. जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये पहिली उचल दिली नाही, अशा कारखान्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

रविकांत तुपकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील बर्‍याच कारखान्यांकडे शेतकर्‍यांच्या उसाची पहिल्या हप्त्याची येणेबाकी आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून गनिमी काव्याने आंदोलन करणार आहे.  कारखाना कुणाचा आहे हे न पहाता आंदोलन केले जाणार आहे. पांढर्‍या कपड्यातील दरोडेखोरांना वठणीवर आणण्यासाठी किसान पुत्र आर्मी संघटना  तयार करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेटे यांच्या नेतृत्वाखाली देशातील 90 हून अधिक शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात लवकरच शेतकरी संपावर जाणार आहे. 

साखरेला दर नसल्याचे सांगितले जात असले तरी ठरल्यानुसार दर देणे कारखानदारांना परवडणारे आहे. साखर कारखान्यांकडून 20 टक्के साखर सरकार खरेदी करणार ही केवळ घोषणाच राहिली. केंद्रीय अर्थसंकल्प शेतकर्‍यांना अर्पण असल्याचे सरकार सांगत असले तरी त्यामुळे भाजप सरकारला मनमोहनसिंग सरकार इतकाही शेतीमालास दर देता आलेला नाही, असेही तुपकर म्हणाले. 

कर्जमाफी म्हणजे शेतकरी भीक मागत नाही. इतर वस्तूंचे भाव वाढले मात्र, शेतीमालाला किंमत नाही. शेतकर्‍यांना 70 वर्षात लुटले. शेतकर्‍यांचेच सरकारकडे पैसे शिल्लक  पडले आहेत. जगातील सर्वात मोठा विमा जाहीर केला तरी त्याच्या रक्‍कमेत कुणीही पाच लाखाचा विमा देवू शकत नाही. सरकारच्या नावाने शेतकरी चिठ्ठया लिहून आत्महत्या करु लागले आहेत. शेतकर्‍यांच्या मुलींच्याही आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सरकार गंभीर नाही. राज्यकर्त्यांना शेतकर्‍यांच्या रक्‍ताचा नैवेद्य हवा आहे का?  असा सवालही तुपकर यांनी केला. 

शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास खात्यांच्या मंत्र्यांना जनतेने तिथून पळवून लावले. नैतीकता स्वीकारुन संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही तुपकर यांनी केली. मतांचे धु्रवीकरण करण्यासाठी भीमा-कोरेगाव दंगल घडवली. भविष्यातही अशा दंगली घडवल्या जाण्याची शक्यता आहे. भाजपला सत्‍ता मिळत नव्हती. त्यातच पंधरा वर्षांनी नवसाने लेकरु झाले. त्यामुळे राज्यकर्त्यांना कारभार करताना सुधरेना.  शिवछत्रपतींची साथ, चला घालू भाजपच्या पेकटात लाथ, अशीही टीका तुपकर यांनी केली. 

राजकीय वाटचालीबाबत विचारले असता तुपकर म्हणाले, संघटना सर्वच पक्षांना समान अंतरावर ठेवून आहे. संघटनेने जबाबदारी दिली तर माढा मतदारसंघातून लढेन, असेही तुपकर यांनी सांगिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, सातारा तालुकाध्यक्ष शंकर शिंदे आदि  उपस्थित होते.घोटाळेबाजांना केंद्राचे अभय
आयपीएल सट्ट्यातील ललित मोदी, पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदी, रोटोमॅक घोटाळ्यातील कोठारी, किंगफिशर कंपनीचा विजय मल्ल्या हे सर्व घोटाळेबाज मोदी सरकारच्या जवळचे आहेत. त्यांना केंद्र सरकारचा पाठिंबा असल्यामुळेच ते परदेशात पळून जाण्यात यशस्वी झाले.

उद्योगपती हजारो कोटींची कर्जे बुडवतात, पण शेतकर्‍यांवर कर्जमाफीची वेळ आली की पोकळ आश्‍वासने दिली जातात. समृद्धी मार्ग, बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत, पण शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत. प्रकल्पांसाठी, दिंडीमार्गासाठी जबरदस्तीने शेतकर्‍यांकडून जमिनी काढून घेतल्या जात आहेत. पुढील दहा वर्षांत शेतकर्‍यांच्या हाती शेती न ठेवता उद्योगपतींकडे जाईल, असे धोरण रावबले जात आहे. शेतकर्‍यांच्या थडग्यांवर विकासाचे मनोरे उभे करणार असाल तर भंपक विकास तुम्हालाच लखलाभ, असेही ते म्हणाले.