Mon, Mar 25, 2019 03:15
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › चिमुरडीला कंबरेला बांधून मातेची आत्महत्या

चिमुरडीला कंबरेला बांधून मातेची आत्महत्या

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 11:24PMवेणेगाव : वार्ताहर 

तीन वर्षांच्या चिमुरडीसह मातेने कोपर्डे (ता. सातारा) येथील कृष्णा नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या केल्याचे दुर्दैवी घटना घडली. या घटनेने समाजमन हेलावले असून हळहळ व्यक्‍त होत आहे. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. क्रांती नितीन सूर्यवंशी (वय 23, मूळ रा. हेळगाव, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्या मातेचे नाव असून तीन वर्षांच्या वेदिकासह तिने जीवन संपवले आहे. 

क्रांती सूर्यवंशी यांचे माहेर सातारा तालुक्यातील पाडळी असून सासर कराड तालुक्यातील हेळगाव आहे.  आजोळी कोपर्डे येथे क्रांती आपल्या वेदिका या मुलीसह गेल्या दोन महिन्यांपासून राहत होत्या. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कोपर्डे येथील घरी जेवण झाल्यावर त्या झोपी गेल्या होत्या. गुरुवारी  पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरातील पाठीमागील दरवाजा उघडून त्या घराबाहेर पडल्या. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रात बौद्ध पाणवठ्यावर वेदिकाला स्कार्फने कंबरेला घट्ट बांधून क्रांती यांनी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. 

क्रांती व वेदिका घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. यावेळी नीलकंठ कदम यांना कृष्णा नदीच्या पात्रात मुलीसह क्रांतीचा मृतदेह तरंगत असल्याचे  आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह सहाय्यक फौजदार शशिकांत फडतरे, संजय दिघे, पोलीस समाधान राक्षे, चेतन बगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक संजय दिघे करीत आहेत.

मृत वेदिकाला आजीने कवटाळले

कृष्णा नदीच्या पात्रातून मृत क्रांती व तीन वर्षाच्या वेदिका या चिमुरडीला बाहेर काढताच वेदिकाची आजी वंदना जाधव यांनी मृत वेदिकाला कवटाळून आक्रोश व्यक्‍त केला. हे द‍ृष्य पाहून उपस्थित सार्‍यांचे डोळे पाणावले. क्रांतीने एवढ्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता. चिमुरड्या वेदिकेचा काय दोष? या प्रश्‍नाने प्रत्येकजण हेलावून गेला. वेदिकाच्या आजीसह कुटुंबियांचा आक्रोश यामुळे वातावरण गलबलून गेले होते. 

Tags : Satara, Mothers, suicide, daughter