Tue, Mar 19, 2019 20:51होमपेज › Satara › तलावातील पाणीसाठ्याने शेतकर्‍यांना दिलासा

तलावातील पाणीसाठ्याने शेतकर्‍यांना दिलासा

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:01PMकराड : अशोक मोहने 

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये तळ गाठलेल्या पाझर तलावांमध्ये यावर्षी निम्मा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. ऐन उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणार्‍या लघु पाटबंधारे विभागाच्या 59 तलावांपैकी महत्त्वाच्या 24 तलावात सरासरी 40 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने ओढे व नाले यांना पाणी वाहत आहे. मेरवेवाडीसह वाघेरी व कामथी ही तीन गावे अवलंबून असणार्‍या मेरवेवाडी तलावात तब्बल 60 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

एप्रिल अखेर हा पाणीसाठा पुरेल असा अंदाज वर्तविला जात आहे. लघुपाटबंधारे विभागाचे 59 पाझर तलाव कराड दक्षिण व उत्तर विभागात आहेत. उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी या पाझर तलावांचा चांगला उपयोग होतो. मागील वर्षी फेबु्रवारी महिन्यात तळ गाठणार्‍या या तलावांमध्ये यावर्षी मात्र निम्म्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. 

मसूर विभागात घोलपवाडी तलावात 35 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता साडेचारशे सहस्त्र घ.मीटर  इतकी आहे. या पाण्याचा लाभ घोेलपवाडीसह निगडी, हणबरवाडी या गावांना होतो. या तलावामुळे निगडीच्या ओढ्याला पाणी असल्याने रब्बी पिकांना चांगला फायदा झाला आहे. गायकवाडवाडी तलावात 50 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.  या पाण्यामुळे हेळगाव पाडळी, बानुगडेवाडी येथील ओढे वाहत आहेत. शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होत आहे. खोडजाईवाडी तलावातही 35 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

या शिवाय दक्षिण विभागातील कासारशिरंबे, येणपे, लोहारवाडी, जिंती, अकाईचीवाडी, म्हारूगडेवाडी  या तलावात सरासारी चाळीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर उत्तरेतील पाचुंद, शामगाव, मेरवेवाडी तलावात 60 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मेरवेवाडी तलावाच्या पाण्यावर  मेरवेवाडीसह वाघेरी, कामथी ही गावे अवलंबून आहेत. पिण्यासाठी व शेतीसाठी हा तलाव या भागासाठी वरदान ठरत आहे. या तलावात 60 टक्के इतका  पाणीसाठा शिल्लक असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने तलावात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.