होमपेज › Satara › मानाच्या कावडींनी केला मुंगीघाट सर

मानाच्या कावडींनी केला मुंगीघाट सर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिखर शिंगणापूर : वार्ताहर

हर हर महादेवची गर्जना करत शिखर शिंगणापूर यात्रेत बुधवारी मुंगी घाटातील कावडी सोहळा भक्‍तीमय वातावरणात पार पडला. सायंकाळी उशिरा सासवड येथील भुतोजी महाराज तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली. यावेळी सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती होती.

चैत्र शुद्ध पंचमीला शिवपार्वती हळदी समारंभाने शंभू महादेव यात्रेस उत्साहात प्रारंभ झाल्यापासून धज बांधण्याचा सोहळा, शिवपार्वती सोहळा, भातांगळीच्या मानाच्या काठीचे महादेव दर्शन आदी सोहळे पार पडल्यानंतर बुधवारी मानाच्या कावडी मुंंगी घाट सर करतात, याची उत्सुकता होती. यात्रेचे खास आकर्षण असलेला मुंगीघाटातील कावडींचा रोमहर्षक सोहळा हर हर महादेवच्या जयघोषात उत्साहात पार पडला. 

मध्यरात्रीपासूनच पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातून आलेल्या शेकडो मानाच्या कावडी पायरी मार्गाने मंदिराकडे वाजतगाजत जात होत्या. दुपारी बारानंतर मुंगीघाट कावडी सोहळ्यास प्रारंभ झाला. सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोथळे गावात सर्व कावडींचे स्वागत केले. सासवड, खळद, शिवरी, एखतपूर, बेलसर, कुंभारवळण, खानवडी, बारामती, इंदापूर, गुणवरे, माळशिरस यांसह अनेक कावडी कोथळे गावापासून निघाल्यानंतर चार टप्प्यात मुंगीघाट डोंगरमाथ्यावर चढवण्यात आल्या. कावडी चढवताना हजारो भाविक अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाले. भक्‍तिमय वातावरणात मानवी हातांची साखळी करून मुंगीघाट पार करताना अबालवृद्धांसह महिला भाविकांचा उत्साह द्विगुणित करणारा होता. ‘हरहर  महादेव’, ’ म्हाद्या धाव’, अशी शिवगर्जना करत घाटमाथ्यावर बसलेले लाखो भाविक टाळ्यांची दाद देत कावडीधारक भाविकांचा उत्साह वाढवत  होते.

त्यामुळे कडक उन्हाची तमा न बाळगता कावडी मुंगीघाट चढून जात होत्या. सर्वांत शेवटी सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे (भुतोजी महाराज तेली) यांची मानाची कावड मुंगीघाटातून वर येताच डोंगरमाथ्यावरील लाखो भाविकांनी ‘हरहर महादेव’ असा जयघोष केला. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी यामुळे मुंंगीघाट शिवमय झाला होता. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी जी. डी. शेलार, पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे, सपोनि प्रवीण पाटील, गोरख बोबडे यांसह शिंगणापूर ग्रामपंचायतीच्यावतीने कावडींचे स्वागत करण्यात आले. 

त्यानंतर मानाच्या कावडी वाजत-गाजत मंदिराकडे गेल्या. देवस्थान समितीच्यावतीने व्यवस्थापक मोहन बडवे यांनी कावडींचे स्वागत केले. सर्व कावडींनी शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रा उत्सवाची सांगता झाली. कावडीसोहळा पाहण्यासाठी चार लाखांवर भाविकांची उपस्थिती होती. यात्रेसाठी पोलीस, महावितरण, एसटी, आरोग्य विभागाने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. यात्रेसाठी कोल्हापूर येथील व्हाईट आर्मी व सह्याद्री ट्रेकर्सचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने  7 शासकीय व 10 सहकारी टँकरद्वारे कारूंडे तलावातून पाणीपुरवठ्याची सोय केली..

Tags : Satara, Satara News, four, lakh, devotees, attendance, kavadi sohhla


  •