Thu, May 23, 2019 05:15होमपेज › Satara › मान्सूनपूर्व पावसाने ठिकठिकाणी हानी

मान्सूनपूर्व पावसाने ठिकठिकाणी हानी

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:26PMसातारा : प्रतिनिधी

मान्सूनपूर्व पावसाने सातार्‍यासह वाई, खटाव व फलटण तालुक्यांतही रविवारी हजेरी लावली. वादळी वार्‍यासह कोसळलेल्या या पावसाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही वाकले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोलमडली. नागरिकांना अंधारात चाचपडावे लागले. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसत आहे. रविवारीही सातारा शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आभाळ काळवंडून जोरदार वार्‍यासह पाऊस झाला. वळवाचा तडाखा बसण्याची चिन्हे असतानाच हा पाऊस कचरता गेला. दरम्यान, वाई, फलटण व खटाव तालुक्यांत मात्र या पावसाने हानी झाली. 

वडूजला वीज खांब कोसळले

वडूज परिसरात रविवारी सायंकाळी विजेचा कडकडाट, वादळी वार्‍यासह पाऊस पडला. वादळामुळे वडूज-पुसेगाव रस्त्यावर मार्केट कमिटी समोर असणारे वडाचे झाड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.  भाग्योदयनगरमधील रस्त्यावर लिंबाचे झाड पडल्याने वाहतूकदारांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज चौकातील एका पान शॉपमध्ये वारे शिरल्याने पान शॉप गटारात पडले. जिल्हा परिषद बांधकाम विभाग परिसरातील लिंबाचे झाड विद्युत वाहिनीवर पडल्याने वडूजमध्ये विजेचा खोळंबा झाला. वडूज-नढवळ रस्त्यावर मळवी येथे विजेचे खांब पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अर्ध्या तासाच्या पावसाने वडूजमध्ये मोठे नुकसान केले.

विडणीत झाड कोसळले

फलटण शहर व परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन पूर्वपदावर आले नसतानाच रविवारी पुन्हा तालुक्याला झोडपून काढले. शहर परिसर व तालुक्यात काही ठिकाणी गारांचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. याचा फटका शेतकरी व व्यापार्‍यांना बसला. दरम्यान, विडणीत  महाड-पंढरपूर मार्गावर आंब्याचे झाड पडल्याने वाहतूक काही काळ कोलमडली होती. 
रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अचानक वादळी वारे व गारासह पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतमालाचे नुकसान झाले. तर व्यापारांचाही माल भिजल्याने नुकसान झाले. पाऊस पडल्याने महावितरणने तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ अंधारात रहावे लागले. विडणी येथे महाड - पंढरपूर महामार्गावर गणेशशेरी परिसरात आंब्याचे झाड पडल्याने पूर्ण रस्ताच ब्लॉक झाला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

पाचवड - भुईंज परिसरात वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने दैना उडवली. महामार्गावर बदेवाडीनजिक झाड  पडल्याने हाय पॉवरची वायर तुटल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुईंज परिसरात पावसाने नागरिकांची दैना उडवली. वादळी वार्‍यामुळे पडलेले झाड हटवण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.  
दरम्यान, वाई तालुक्यात धुवाँधार पावसाने हजेरी लावली असून  या पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी टोमॅटोचेही नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

धावत्या कंटेनरवर झाड कोसळले

पुणे - बंगळूर महामार्गावर वळसे (ता. सातारा) येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे कंटेनरवर वडाचे झाड कोसळले. त्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली. परिसरात आज सायंकाळी जोराचे वारे सुरू होते. त्यानंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला. अशात वळसे येथील पेट्रोल पंपानजीक रस्त्यालगत असलेले वडाचे झाड धावत्या कंटेनरवर कोसळले.
चालकाने प्रसंगावधान दाखवून कंटेनर थांबवल्यामुळे अनर्थ टळला. मात्र झाड मध्येच कोसळल्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मात्र सततच्या पावसामुळे झाड बाजूला काढण्यास विलंब लागला. त्यातून भरतगावपर्यंत वाहनांची रांग लागली होती. काहींनी सेवारस्त्यावरुन वाहने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही वाहनांची कोंडी झाली. रात्री उशीरापर्यंत हेच चित्र कायम होते.

कलेढोण परिसरात पाऊस                

कलेढोण व परिसरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसाने सगळीकडेच पाणीच पाणी झाले. या पावसाने कलेढोण व परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग येणार आहे.