Sun, Apr 21, 2019 04:27होमपेज › Satara › सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या

सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 10:05PMसातारा : प्रतिनिधी

व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीपोटी वारंवार दिलेल्या त्रासास कंटाळून मल्हार पेठेतील राजेंद्र धर्मादास घाडगे (वय 50) यांनी तीन आठवड्यांपूर्वी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. 

नागेश फडतरे (रा. कणसे हॉस्पिटलसमोर, सदरबझार) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र घाडगे हे मल्हार पेठेत राहण्यास होते. शाहूनगर येथून दि. 17 जानेवारीला घाडगे दुचाकीसह निघून गेले होते. शोधूनही ते न सापडल्याने त्यांच्या कुटुंबियांनी याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. दि. 18 रोजी देगाव (ता.सातारा) येथील एका विहिरीत उडी मारुन घाडगे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. दरम्यान, घाडगे यांनी खासगी सावकार फडतरे याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार रजनी राजेंद्र घाडगे यांनी सोमवारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

1999 ते 2018 या कालावधीत फडतरे यांनी व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी राजेंद्र घाडगे यांना वारंवार त्रास दिला होता. चक्रवाढ पध्दतीने व्याज वसुल करत ते न दिल्यास दमदाटी करत फडतरेने जबरदस्ती घाडगे यांच्याकडून कोरे स्टँम्प व चेक घेतले होते. या स्टॅम्प व चेकच्या मदतीने फडतरे याने त्रास देत रक्कम सहा महिन्यात फेडण्यासाठी घाडगेंवर दबाव आणला होता. या दबावातूनच घाडगे यांनी आत्महत्या केल्याचे रजनी घाडगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.