Wed, Sep 19, 2018 14:44होमपेज › Satara › सावकारीप्रकरणी गुन्हा 

सावकारीप्रकरणी गुन्हा 

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:31PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी वारंवार फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातार्‍यातील एका महिलेसह चौघांवर तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल जयसिंगराव जाधव (रा.करंडी ता.सातारा) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दीड वर्षांपूर्वी अनिल जाधव यांनी दूध व पशुखाद्य व्यवसाय सुरु करण्यासाठी संबंधित महिलेकडून तीन लाख रुपये दर महिना दहा टक्के व्याजाने घेतले होते. व्याजाने पैसे घेतल्यानंतर जाधव यांनी ठरल्याप्रमाणे व्याजाची फेड केली. व्याज व इतर देणी देवूनही संबंधित महिला फोन करुन आणखी दोन लाख रुपये बाकी राहिल्याचे सांगून ते पैसे देण्यासाठी धमकी देत होती.

दि. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी संबंधित महिला ही जाधव यांच्या करंडी येथील घरी गेली. त्यावेळी तिच्यासमवेत चार युवक होते. संशयित सर्वांनी जाधव यांना शिविगाळ करत दोन लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देत असतानाच घरातील महिलांनाही शिवीगाळ केली. संशयित महिला वारंवार फोन व मेसेज करुन जाधव यांना त्रास देत होती. या  त्रासाला कंटाळून जाधव यांनी तालुका पोलिसात शनिवारी रात्री तक्रार दिली. त्याचा पुढील तपास उपनिरीक्षक सी. एम. मछले हे करत आहेत.