Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Satara › माक्या शिरतोडे टोळीला मोक्‍का

माक्या शिरतोडे टोळीला मोक्‍का

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 21 2018 1:33AMफलटण : प्रतिनिधी

फलटणसह जिल्ह्यात ठिकठिकाणी अक्षरश: धुमाकूळ घातलेल्या सराईत गुन्हेगार महेश ऊर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे व त्याच्या दोन साथीदारांवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी संघटित गुन्हेगारी (मोक्‍का) अंतर्गत कारवाई केली. या टोळीवर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्यात या टोळीने फलटण येथे दोन महिलांसह एकाला मारहाण करून 50 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता.

दि. 28 जानेवारी 2018 रोजी या प्रकरणातील तक्रारदार दोन चुलत बहिणींसह भाच्याचा फलटण येथील नारळीच्या बागेजवळ शोध घेत होते. याच वेळी संशयित तिघे जण त्या ठिकाणी दुचाकीवरून आले. संशयितांमध्ये माक्या शिरतोडे व त्याचे दोन साथीदार होते. संशयितांनी दुचाकी तिघांसमोर आडवी मारून दमदाटी करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे तक्रारदारासह दोन्ही महिला घाबरल्या. संशयितांनी याचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने तिघांकडील सोन्याचे दागिने, रोख रक्‍कम मोबाईल असा 47 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला.

या घटनेनंतर तक्रारदार यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर तपासामध्ये कुख्यात गुन्हेगार माक्या शिरतोडेसह त्याच्या टोळीने हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. माक्या शिरतोडेची टोळी रस्त्यावरुन येणार्‍या-जाणार्‍यांची लुटमार करण्यात पटाईत आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्याचा उलगडा झाला. दरम्यान, संशयित टोळीवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, गर्दी, मारामारी असे अनेक गुन्हे केले आहेत. या टोळीवर जिल्ह्यातील फलटण शहर, वाई, बारामती, वाठार, पुसेगाव, सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

फलटण पोलिस जानेवारी महिन्यातील जबरी चोरीचा तपास करत असताना या टोळीविरुध्द भक्‍कम पुरावे मिळाले. यामुळे या टोळीविरुध्द फलटणचे पोनि एस.व्ही.हंकारे यांनी मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला. हा प्रस्ताव पुढे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला असताना त्यांनी त्याला मंजुरी दिली आहे.आता या मोक्‍काचा तपास पोलिस उपअधीक्षक डॉ.अभिजीत पाटील हे करणार आहेत. या टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेवून संघटीत टोळीविरुध्द प्रभावी कारवाई केली जाणार आहे.