Fri, May 24, 2019 21:14होमपेज › Satara › गुंड दत्ता जाधवसह टोळीवर ‘मोका’

गुंड दत्ता जाधवसह टोळीवर ‘मोका’

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

जत तालुक्यातील प्रतापपूर येथे पोलिस पकडण्यासाठी गेल्यानंतर ग्रामस्थांना चिथावणी देऊन पोलिस पथकावर हल्ला करून दोन महिला पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित सातार्‍याचा गुंड दत्तात्रय ऊर्फ दत्ता जाधव याच्यासह त्याच्या टोळीवर ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये त्याचा भाऊ युवराजसह टोळीतील 18 जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली. 

दत्तात्रय रामचंद्र जाधव, युवराज रामचंद्र जाधव, शिवाजी बाळू पवार, भेजा वाघमारे, खली ऊर्फ कृष्णा हणमंत बडेकर, अमर रामचंद्र भांडे, अमोल रेवाप्पा होनेकर, जया जाधव, बंडा पैलवान, दीपक आप्पा लोंढे, अजय ऊर्फ लल्लन दत्तात्रय जाधव, सूरज ऊर्फ पप्पू घुले, मनीषा युवराज जाधव, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर, मयुरी धोंडिराम ऐवळे, करिष्मा भीम हेगडे, मथुरा शामराव ऐवळे, सोमनाथ उत्तम मोरे अशी ‘मोकां’तर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. 

दत्ता जाधववर दरोडा, जबरी चोरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणी, शासकीय कामात अडथळा आणणे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून असे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने सांगली आणि सातारा जिल्ह्यांत दहशत निर्माण केली होती. दि. 14 एप्रिल रोजी खंडणीच्या गुन्ह्यासह मोक्कामध्ये फरारी असलेल्या दत्ता जाधवला अटक करण्यासाठी वाठारचे सहाय्यक निरीक्षक मयूर वैरागकर  हे पथकासह गेले होते. त्यावेळी त्यांनी जत पोलिसांची मदत मागितली होती. 

त्यादिवशी रात्री जत आणि सातारा पोलिसांचे पथक दत्ताला अटक करण्यासाठी प्रतापपूर गावी गेले होते. तेथे यात्रा सुरू होती. पोलिस पथक आल्याचे पाहून त्याने ध्वनीक्षेपकावरून पोलिसांना मारहाण करून  पळवून लावण्याची चिथावणी दिली. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. त्यावेळी युवराज जाधव व कृष्णा बडेकर यांनी दोन महिला पोलिसांचा गळा आवळून त्यांच्या खुनाचा प्रयत्नही केला होता. त्याशिवाय त्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले होते. 

या घटनेनंतर दत्ता जाधवसह 18 संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ला आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर यातील संशयितांना अटक करण्यात आली होती. दत्ता जाधवसह त्याच्या टोळीच्या वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे जत पोलिसांनी त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव  अधीक्षक शर्मा यांच्याकडे पाठविला होता. शर्मा यांनी तो मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. अधीक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजू ताशिलदार, श्रीकांत पिंगळे, सिद्धाप्पा रूपनर, विशाल भिसे, उमरगूल फकीर, सागर टिंगरे यांनी ही कारवाई केली.