Sat, Mar 23, 2019 00:03होमपेज › Satara › श्री विठ्ठलाचे दर्शन घडणे ही भाग्याची गोष्ट : मोहन भागवत

श्री विठ्ठलाचे दर्शन घडणे ही भाग्याची गोष्ट : मोहन भागवत

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:31PMपंढरपूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. श्री विठ्ठलाचे दर्शन घडणे ही जन्मजन्मांतरीच्या भाग्याची गोष्ट आहे, असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शाल, श्रीफळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन भागवत यांचे स्वागत केले.

मोहन भागवत म्हणाले, पांडुरंग हे जगभरात भक्तीचे दैवत म्हणून ओळखले जाते. पांडुरंग नेहमीच सर्वांना बळ देत आला आहे. पांडुरंगाने सर्व संत आणि भाविकांचा मेळ घडवून आणत भक्तीचे मोठे अधिष्ठान निर्माण केले. 

डॉ. भोसले यांनी सांगितले की, भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे यासाठी टोकन पद्धती अवलंबिण्यात येणार आहे. भाविकांना देण्यात येणार्‍या लाडू प्रसादाची निर्मिती एफडीआयच्या निकषानुसार करण्यात येत आहे. मंदिर परिसरातील स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलली जात आहेत. संत विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. 

याप्रसंगी संघाच्या कुटुंब प्रबोधन गतीविधीचे राष्ट्रीय संयोजक प्रा. डॉ. रवींद्र जोशी, संघाचे पश्‍चिम क्षेत्र प्रचारक विजयराव पुराणिक, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव, पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे, सोलापूर जिल्हा संघचालक माधव मिरासदार, मंदिर समितीचे सदस्य गहिनीनाथ औसेकर महाराज, आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिर समितीचे उपक्रम स्तुत्य

मोहन भागवत यांनी मंदिर समितीचे उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारा भाविक हा देखील पांडुरंगाचेच रूप असून, त्याची सेवा कशी करावी किंवा त्याच्याशी कसे वागावे याचे प्रकर्मचार्‍यांना देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.