Mon, May 20, 2019 20:38होमपेज › Satara › मोक्कातील गुंडाचा पैसा बिल्डिंगमध्ये व्हाईट

मोक्कातील गुंडाचा पैसा बिल्डिंगमध्ये व्हाईट

Published On: Jun 03 2018 1:20AM | Last Updated: Jun 02 2018 11:10PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात व्यापार्‍यांच्या छाताडावर बसून काही भंगारछाप नामचीन गुंडाच्या पैशाच्या जोरावर बेकायदेशीर बिल्डिंग बांधत असल्याचे वृत्त दै. ‘पुढरी’ ने प्रसिध्द केल्यानंतर सातार्‍यातील बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या या जागेवरच आता बांधकाम करण्याच्या हेतूने हालचाली सुरु झाल्या असून पोलीसांना आता या प्रकरणी कारवाईचा हिसका दाखवावा लागणार आहे. संबंधितांचे बँकिंग व्यवहार व त्यांचा अन्य गोलमाल समोर आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 

सातार्‍यात एका वर्दळीच्या ठिकाणी सुमारे 50 वर्षांपासून हातावरचे पोट असणार्‍या व्यवसायिकांच्या दुकानांचा जबदरस्तीने ताबा घेवून दहशत निर्माण केली जात आहे. वास्तवीक मनी व मसलच्या जोरावर हे बिनधोकपणे सातार्‍यात घडत असताना यातील काही पिडीत पोलिसांना भेटले मात्र कोट्यवधींची प्रॉपर्टी असलेल्या भंगारछापांनी पैसा फेको तमाशा देखोचे सत्र राबवून यंत्रणाच हाताच्या इशार्‍यावर नाचवण्यास सुरुवात केली आहे.

गुंडगिरी करणारे यामधील कथित बिल्डर हे केवळ प्यादी असून त्यांना गुंडांचा फायनान्स असल्याचे वास्तव आहे. गुंडगिरीच्या जोरावर या टोळीने धुडघुस घातला असून अनेक जबरदस्तीचे उद्योगही सुरु आहेत. यातील एक हा मोक्कातील  गुंडाचा हस्तक असून तो सर्व गोष्टी मॅनेज करत आहे. हा पूर्वाश्रमीचा प्यादा सातार्‍यातील गुंडाचा पंटर आहे. यानेच पोलीस दलातील काही अधिकार्‍यांना भेटून मांडवल्या केल्या आहेत. बैठकीमध्ये पैसे देवाणघेवाण झाल्यानंतर संबंधित पोलिसांनी त्यांना काम झाल्याची जणू तोंडी ‘एनओसीच’ दिली आहे. या अधिकार्‍यांच्या संगनमताने लाखो रुपयांच्या तोडी झाल्या असून पोलीस  दलातीलच काही लोक कायदेशीर सल्लागार झाले आहेत. या बिल्डिंगला अनेकांचा विरोध असून याला वाचा फुटू लागताच तोडी बहाद्दरने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसच आता त्यांचा कायदेशीर सल्लागार झाल्याचे समोर येत आहेे. त्यासाठी पुन्हा त्याने पदरात लक्ष्मी पाडून घेऊन सल्ला दिला आहे. जागा खाली करा, बिल्डींगचे काम चालू द्या प्रसंगी कोणावरही खोटे गुन्हा दाखल करण्याची वेळ आली तर तसेही करू असा सल्ला पोलिसानेच दिला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत या घटनेला पुन्हा वेग आला आहेे.संबंधित जागेवरील जुने बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरु असून नव्या बांधकामासाठी हा अट्टाहास सुरु आहे. 

वास्तवीक एसपी संदीप पाटील यांनी सातार्‍यातील समुळ गुन्हेगारी मोडीत काढण्याचा चंग बांधला असताना पोलीस दलातीलच काही जणांकडून त्याला हरताळ फासला जात आहे. मोक्कातील गुंडाच्या प्याद्यांकडून सातार्‍यातील मोक्याच्या जागेचा ताबा मिळवून त्यातून ब्लॅक पैसा बिनधोकपणे व्हाईट होत आहे. या प्रवृत्तीला सातारकरांचा विरोध आहे. उद्या हेच गुंड पुन्हा धुडगूस घालण्यास सज्ज होण्याची शक्यता आहेे. यामुळे अधीक्षकानी स्वतः लक्ष घालून दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे, अशी मागणी होत आहे.