Tue, Mar 19, 2019 11:41होमपेज › Satara › दुष्काळ हटवण्यासाठी युवक एकवटले

दुष्काळ हटवण्यासाठी युवक एकवटले

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 9:59PMपिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे  

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील एक प्रमूख बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून जशी पिंपोडे बुद्रुक गावाची ओळख आहे. तशीच पिढ्यानपिढ्या कायम दुष्काळी म्हणूनही हे गाव ओळखले जाते. आता मात्र आपल्या गावाला लागलेला हा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गावातील युवक एकवटले असून पाणी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन जलसंधारणाच्या कामाबरोबर मनसंधारणही करण्यात युवक गुंतले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पिंपोडे बुद्रुक गावाबरोबर उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक गावे दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करतात हा आजवरचा अनुभव आहे. मात्र, गेल्या 3-4 वर्षांत या दुष्काळी गावांमधील ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटू लागले आहे. डोंगराकडेला असणार्‍या वाड्या-वस्त्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण होऊ लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जर छोटी-छोटी गावं स्वयंपूर्ण होत असतील तर आपण का नाही? हे काम करू शकत या ध्येयाने युवक मंडळी जलसंधारण कामात पुढाकार घेऊ लागली आहेत.

त्याचाच परिपाक म्हणून बिचुकले व अनपटवाडी या गावांनी लोकसहभागातून गेल्या वर्षी जलसंधारणाचे प्रचंड काम केले. या कामात ग्रामस्थांनी आणि प्रशासनाच्या बरोबरीने अनेक सेलिब्रिटींनी श्रमदान करून आपला सहभाग नोंदवला आहे.

तालुक्यातील गावांनी केलेल्या या जलसंधारण कामाची पाहणी युवकांनी केली असून त्याच धर्तीवर आपण ही हे काम करू शकतो या आत्मविश्‍वासाच्या बळावर नुकतीच 7 पुरुष आणि 2 महिला अशी 9 जणांची टीम बिदाल (ता. माण) येथे जाऊन प्रशिक्षण घेऊन आली आहे. आता गावात बैठका घेऊन पाणी बचतीचे महत्त्व सांगण्याबरोबरच जनजागृती केली जात आहे. 

सध्या कामे करण्यास आवश्यक असणार्‍या वनविभागाच्या परवानग्या मिळवण्याचे काम सुरू आहे. गावाच्या पाणलोट क्षेत्राचा आराखडा बनवणे, माती परीक्षण करण्यासाठी मातीचे नमुने गोळा करणे, 21 हजार झाडे लावण्यासाठी बिया गोळा करणे ही कामे प्रगतीपथावर आहेत. गावात 1 हजार 100 शोष खड्डे काढण्याचा युवकांचा मानस असून त्याचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे.