Fri, Jul 19, 2019 20:45होमपेज › Satara › जेलमध्ये संशयिताकडे मोबाईल

जेलमध्ये संशयिताकडे मोबाईल

Published On: Apr 22 2018 6:31PM | Last Updated: Apr 22 2018 6:31PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्ग 2 (जेल) येथे संशयित आरोपी संजय नामदेव जाधव (वय 39, रा. मु. पिंपळवाडी, पो. धावडशी ता. सातारा) याच्याकडे मोबाईल सापडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी हा शौचालयात मोबाईलवर बोलत असताना पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याची पोलखोल झाली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, सातारचे मध्यवर्ती कारागृह हे शहर पोलिस ठाण्यालगतच आहे. रविवारी या कारागृहात पोलिस हवालदार दत्तात्रय चव्हाण हे कार्यरत होते. जेलमधील स्वच्छतागृहाकडे  गेल्यानंतर त्यांना दोन व्यक्ती बोलत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित संभाषण कुठे सुरु आहे? हे पाहण्याचा पोलिसाने प्रयत्न केला असता संशयित आरोपी संजय जाधव हा फोनवर बोलत होता.

या घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर जाधव याची झाडाझडती घेतली. त्याच्या मोबाईलमध्ये सीमकार्ड, बॅटरी व मोबाईल चार्जरही आढळला. संशयिताकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या मुलाने चार दिवसांपूर्वी भेटायला आल्यानंतर भिंतीवरुन मोबाईल टाकल्यानंतर तो घेतला असल्याचा जबाब संशयिताने दिला आहे. या सर्व प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारागृह पोलिस हवालदार दत्तात्रय चव्हाण यांनी तक्रार दिली.

दरम्यान, मोबाईल भिंतीवरुन टाकणे, चार दिवस संशयित आरोपी मोबाईल वापरणे यामुळे कारागृहाची सुरक्षितता धोक्यात आली असून सीसीटीव्हीमध्ये या घटना कशा काय कैद झाल्या नाहीत? अशी चर्चा सुरु झाली आहे.