Sat, Mar 23, 2019 02:45होमपेज › Satara › ग्रामपंचायतीच्या वर्गणीवरून हमरी-तुमरी

ग्रामपंचायतीच्या वर्गणीवरून हमरी-तुमरी

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 11:03PMकोडोली : वार्ताहर

सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत पीआरसीच्या  खर्चासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीने 5 हजार रुपये गोळा केल्याचा आरोप विरोधकांकडून झाल्याने सत्ताधारी -विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली. विरोधकांना आरोप सिद्ध  करता न आल्याने विरोधकांचा फुसका बार ठरल्याने झाकली मूठ ठेवा  म्हणण्याची पाळी आली.सातारा पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभापती मिलींद कदम यांच्या अध्यक्षतेखाली  उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली.

सभेमध्ये  सदस्य संजय घोरपडे यांनी सातारा पंचायत समितीला पंचायतराज  समितीच्या सदस्यांनी भेट दिली. या भेटीच्या खर्चासाठी पंचायत समितीचे सभापती - उपसभापती यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून 5 हजार रुपयांची वर्गणी गोळा केली. पीआरसीच्या खर्चासाठी एवढी रक्‍कम लागते का? खर्चासाठी ग्रामपंचायतीकडून पैसे गोळा करता येतात का? ग्रामसेवकांकडून वर्गणी गोळा केली का नाही? असे आरोप यांनी केले.

यावर सभापती - उपसभापतींसह सदस्य राहुल शिंदे, अरविंद जाधव, दयानंद उघडे या सर्वांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. पैसे कोणी घेतले, पैसे कोणी दिले. कोणाकडे दिले याचे पुरावे सादर करा, असे सांगितले. पैसे कोणी घेतले असतील तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ज्या ग्रामपंचायतीकडून पैसे घेतले त्या ग्रामसेवकांची सभागृहापुढे नावे सांगा. चुकीचे आरोप करु नका. आजपर्यंत सभापती - उपसभापतींसह सत्ताधारी सर्व सदस्य कोणाच्याही एका रुपयाला मिंधे नाहीत. उगाच अकलेचे तारे तोडू नका, असे जितेंद्र सावंत यांनी ठणकावून सांगितले. शेवटी घोरपडे यांना झाकली मूठ ठेवा असे सांगण्याची पाळी आली. यावेळी सत्ताधारी-विरोधक यांच्यात विविध वर्गणीवरुन आरोप - प्रत्यारोप झाले. पण विरोधकांना एकही ठोस पुरावा सादर करता न आल्याने सत्ताधार्‍यांचा बार फुसकाच ठरला.

जीवन प्राधिकरण आढाव्यादरम्यान शाहूपुरी - कोडोली पाणी पुरवठा ठेकेदार भिवरे यांच्यावर कामात दिरंगाई केल्याबद्दल त्यांच्यावर बसवण्यात आलेला 2 कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई तातडीने करावी, अशी मागणी जितेंद्र सावंत यांनी केली. सदस्य संजय पाटील, रामदास साळुंखे, हणमंत गुरव यांनी आसनगाव पाणी पुरवठा ठेकेदाराचीही चौकशी करा, अशी मागणी केली. यावेळी विरोधकांनी स्वत:चे ठेवायचे झाकून मात्र दुसर्‍याचे पहायचे वाकून असा टोमणा सत्ताधार्‍यांनी मारला.

सार्वजनिक बांधकाम आढाव्यादरम्यान देगाव फाटा ते औद्योगिक वसाहतीमधून गेलेल्या रस्त्यावर कायमस्वरुपी अतिक्रमणे झाली आहेत. या रस्त्याची मालकी कोणाकडे आहे. ही अतिक्रमणे कधी काढणार? असा प्रश्‍न रामदास साळुंखे यांनी केला असता संबंधित अधिकार्‍यास समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. जिल्हा परिषद बांधकाम आढाव्यादरम्यान ग्राम मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे मुजवण्यासाठी निधी आला आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व खड्डे मुजवावेत, अशी मागणी संजय पाटील, राहुल शिंदे यांनी केली. पशुसंवर्धन विभाग आढाव्यादरम्यान वडूथ येथील व पशु संवर्धनचे डॉक्टर सोनगाव सं. निंब येथे वरिष्ठांनी सांगूनही गेले नाहीत. त्यांची चौकशी व्हावी. तसेच कृषिविभागाचे आरफळचे सुपरवायझर यांच्याबद्दल शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांची ही चौकशी व्हावी करण्याची मागणी सावंत यांनी लावून धरली.

हरिष पाटणे यांच्या अभिनंदनाचा ठराव

दै.‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक हरिष पाटणे यांना महाराष्ट्रदिनी मानाचा दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल हरिष पाटणे यांच्या अभिनंदनचा ठराव सातारा पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आला. हा ठराव राहुल शिंदे यांनी मांडला. यावेळी सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात हा ठराव एकमताने मंजूर केला. 

Tags : Satara, Miss understanding , classification, Gram Panchayat