Mon, May 25, 2020 23:42होमपेज › Satara › ट्रॅव्हल्सची वरात पोलिस ठाण्यात

ट्रॅव्हल्सची वरात पोलिस ठाण्यात

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:44PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पुण्याहून वासोटा बघण्यासाठी आलेल्या मुलांची ट्रॅव्हल्स व  दुचाकी यांचा सातार्‍यात पोवई नाक्यावर शनिवारी दुपारी किरकोळ अपघात झाला. यावेळी ट्रॅव्हल्समधील मुलांनी दुचाकीवरील दिव्यांगांना उध्दटपणे वर्तणूक केली. घटनास्थळी वाहतूक पोलिसही दाखल झाल्यानंतर उद्दामपणे वागणूक देणार्‍या मुलांची ट्रॅव्हल्ससह पोलिस ठाण्यात वरात नेण्यात आली. 

वासोटा किल्‍ला बघण्यासाठी पुण्यातील मुलांची एक ट्रॅव्हल्स  शनिवारी सातार्‍यात आली होती. ही ट्रॅव्हल्स पोवई नाक्यावर आल्यानंतर ट्रॅव्हल्स व दुचाकीचा किरकोळ अपघात झाला. दुचाकीवर दिव्यांग पती- पत्नी आणि त्यांचा मुलगा होता. यावेळी ट्रॅव्हल्समधील मुलांनी उतरून तुमच्या चुकीमुळेच अपघात झाल्याचे सांगत त्या दिव्यांग दाम्पत्याशी शिवीगाळही केली. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र, उध्दट आणि उद्दाम असणार्‍या पुणेरी मुलांनी वाहतूक पोलिसांनाही भीक न घालता तुम्हाला या अपघाताबद्दल काय माहिती आहे, यामध्ये आमची काहीही चूक नाही, तुम्ही या प्रकरणात पडू नका, आम्ही कोण आहेत हे तुम्हाला माहित नाही अशी अरेरावी केली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली. 

मुलांच्या उध्दट वर्तनामुळे पोलिसही चिडले होते. त्यामुळे मुलांना दरडावत मुलांसह त्यांची ट्रॅव्हल्स थेट पोलिस ठाण्यात आणली. पोलिस ठाण्यात गाडी आणल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांनी त्या मुलांची चांगलीच कानउघडणी केली. या प्रकाराची शहरात चर्चा रंगली होती. रात्री उशिरापर्यंत ट्रॅव्हल्स पोलिस स्टेशन परिसरातच होती.

‘तुम्हाला दहा मिनिटात कामाला लावीन..’

पोवई नाक्यावर ट्रॅव्हल्समधील मुलांनी अक्षरश: धुडगूस घातला होता. ते सभ्यतेची कोणतीही भाषा न करता थेट पोलिसांनाही आव्हान देत होते.  एक युवक जोरजोराने पोलिसांना उद्देशून ‘तुम्हाला 10 मिनिटात कामाला लावेन. आम्ही कोण आहे माहित आहे का?’ अशी धमकी देत होता. यावेळी वाहतूक पोलिस एस.एस.जाधव यांनी त्यांना चांगलेच खडसावले.