Mon, May 27, 2019 00:48होमपेज › Satara › ३ ते ९ मे दरम्यान दूध वाटप सत्याग्रह

३ ते ९ मे दरम्यान दूध वाटप सत्याग्रह

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 9:04PMकराड प्रतिनिधी 

एक जूनला झालेला शेतकरी  संप आणि त्यानंतर चाळीस हजार शेतकर्‍यांनी काढलेला लाँग मार्च यावेळी सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी न झाल्याने अ.भा.किसान सभेच्या वतीने 3 ते 9 मे दरम्यान मोफत दूध वाटप सत्याग्रह व एक जून रोजी देशभर सरकारी कार्यालयांना घेराव घालण्यात येणार असल्याची घोषणा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी शनिवारी कराड येथे पत्रकार परिषदेत केली.

यावेळी किसान सभेचे अध्यक्ष अशोक यादव, उमेश देशमुख, खंडू वाघचौरे, माणिक अवघडे, आनंदा मुळगावकर, आनंदी अवघडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. नवले म्हणाले, लाँग मार्चनंतर मुख्यमंत्र्यांनी जी आश्‍वासने शेतकर्‍यांना दिली होती त्यातील अनेक आश्‍वासनांबद्दल अद्याप शासन स्तरावर कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. शेतकरी कर्जमाफी संदर्भात सकारात्मक निर्णय झाला. मात्र, अन्य मागण्यांबाबत सरकार उदासिन आहे. 

कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र अधिकार द्या, देवस्थानच्या जमिनी कसणार्‍यांच्या नावे करा, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्‍न सोडवा, गायीच्या दुधाला दर द्या, या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी किसान सभा आंदोलन करत असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून दि. 3 ते 9 मे दरम्यान दूध वाटप सत्याग्रह करण्यात येणार आहे. ‘लुटता कशाला फुकट न्या’ हे आंदोलनाचे घोषवाक्य आहे. सात दिवस रोज तहसील कार्यालयाबाहेर भागातील शेतकर्‍यांनी आणलेले दूध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींना साखर टाकून प्यायला देणार आहे.

अतिरिक्त दुधाचे गौडबंगाल..

दूध उत्पादक शेतकर्‍यांना जादा दर द्यावा लागू नये म्हणून  दुधाचा महापूर आल्याची आरोळी राज्यसरकारने उठवली आहे. मात्र यामागील वास्तव भयंकर आहे. शेतकर्‍यांकडून 3.5 फॅटचे गायीचे दूध घेऊन ते मशिनमध्ये टाकून एक टँकर दुधाचे तीन टँकर दूध तयार  करण्यात येत आहे. हे दूध केवळ 1.5 फॅटचे आहे. शेतकर्‍यांकडून 25 रूपये प्रतिलिटर  प्रमाणे दूध घ्यायचे व ते दूध  50 रूपये लिटरने विकायचे तेहीगुणवत्ता नसलेले. यामध्ये दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचीही घोर फसवणूक होत आहे. सरकारचा  दूध व्यवसायातील या दलालांना अप्रत्यक्ष  पाठिंबा असल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.