Fri, May 24, 2019 20:38होमपेज › Satara › जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रे ठप्प

जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रे ठप्प

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 10:31PMसातारा : प्रतिनिधी

केरळ व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लीटर 5 रूपये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटेने दूध बंद आंदोलन सुरू केले  असून बहुतांश दूध संकलन केंद्रे बंद होती. त्यामुळे सोमवारी लाखो लिटर दूध शेतकर्‍यांकडे पडून राहिले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर फलटणमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर माण तालुक्यात दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून दूध ओतून देण्यात आले  खटाव तालुक्यातही दूध डेअर्‍या बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

शेतकरी संघटना पदाधिकार्‍यांना अटक

फलटण : प्रतिनिधी

दूध बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील बहुतांश संकलन केंद्रे ठप्प झाली असून या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. 

या सूचनेनुसार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष प्रमोद गाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांचा वॉच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व दूध डेअरी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. यावेळी शेतकरी संघटेनच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन होणारच असल्याचे सांगितले होते. 

जानकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

दहिवडी : प्रतिनिधी

राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या माण तालुक्यातही आज दूध बंद आंदोलनाचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. संतप्त शेतकर्‍यांनी धामणी(ता.माण)येथे हजारो लिटर दुध रस्त्यावर ओतून दिले.मंत्री जानकर यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. दूध बंद आंदोलनात खुद्द दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या माण तालुक्यानेही आघाडी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील दूध संकलन केंद्र सोमवारी बंदच होती. त्यामुळे अनेकांनी दूध ओतून आंदोलनात सहभाग नोंदवला.धामणी येथे संतप्त शेतकर्‍यांनी मंत्री जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालण्यात आला.

बंदोबस्तात टँकर मुंबईकडे 

ओझर्डे : वार्ताहर

दूध बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर कोणताही  अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी कर्मचार्‍यांचा ताफा टोलनाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात होता. त्यामुळे कोणतीही तोडफोड किंवा हिंसक घटना घडली नाही.  

दूध बंदला शेतकरी संघटनेला पाठींबा देण्यासाठी वाई तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी दूध संकलन केंद्रावर पाठवायचे नाही, असा निर्णय घेतला. तालुक्यातील जवळ पास 55 दुध संकलन केंद्रे बंद होती. ही संकलन केंद्रे बंद असल्याने वाई व पाचगणी येथील हॉटेल व्यवसायिकांसह हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना दूध पुरवठा करण्यात आला नाही. या बंदमुळे या व्यवसायाच्या माध्यमातून होणारी लाखो रूपयांची उलाढाल ठप्प झाली होती. याचबरोबर ओझर्डे व भुईंज परिसरात दूध संकलन केंद्रात दूध देत असलेल्या शेतकर्‍यांनाही पोलिसांकडून संरक्षण दिले जात होते. त्याचबरोबर आनेवाडी टोल नाका, पाचवड, भुईंज, जोशी विहिर, बोपेगाव, कवठे, सुरुर आणि वेळे या गावांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

खटावमध्ये संकलन केंद्रांना टाळे
औंध : वार्ताहर

म्हासुर्णे येथील भैरवनाथाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. खटाव तालुक्यात सुमारे 146 गावे आहेत. यामध्ये 225 ते 250 दूध डेअर्‍या आहेत. कायम दुष्काळी झळा सोसणार्या याभागातील बळीराजाचा मागील तीन ते चार वर्षांत दुग्धोत्पादन हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. पण मागील सहा महिन्यात दूध दराने शेतकर्‍यांची पूर्णपणे वाट लावली आहे. ज्या ठिकाणी गाईच्या दरास प्रतिलिटर 30 ते 35 रुपये दर हवा होता तो दर 15 ते 18 रूपयांवर आणून ठेवला आहे. 

त्यामुळे पेंड, चारा, औषधोपचार, नियमित केली जाणारी मेहनत ही यामधून निघत नाही. सोमवारी तालुक्यात आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश दूध संकलन करणार्‍या डेअर्‍या बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर घरातील रतीबाचे दूधही बंद झाले होते. शेतकर्‍यांकडील दूध डेअर्‍यांमध्ये न गेल्यामुळे हजारो लिटर दूध शेतकर्‍यांकडे पडून राहिले. तालुक्यात ठिकठिकाणी या दूधाचे मोफत वाटपही करण्यात आले. या आंदोलनात  आमचे काय नुकसान व्हायचे ते आताच होऊ द्या.पण आम्हाला आता तरी दुधाला योग्य दर द्या, अशा संतप्‍त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.