Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Satara › जिल्ह्यात दूध आंदोलनाची तीव्रता वाढली

जिल्ह्यात दूध आंदोलनाची तीव्रता वाढली

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 11:30PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात दूध आंदोलनाला चांगलीच धार आली असून बहुतांश ठिकाणचे संकलन बंद झाले आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध नोंदवला, तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक, मुलांना दूध वाटप, बासुंदी वाटप असे अनोखे उपक्रम राबवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली. तिसर्‍या दिवशी जिल्ह्यातील दूध आंदोलनाला पाठिंबा वाढला असून संप लवकर न मिटल्यास हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. 

सातारा जिल्ह्यात गेले दोन दिवस बहुतांश ठिकाणी दूध संकलन बंद असून माण तालुक्यात सर्व संकलन केंद्रे बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. माण तालुक्यात 70 हजार लिटर दुधाचे संकलन होते. माणमधून आंदोलनाला जोरदार पाठिंबा असल्यामुळे दूध संकलन केंद्रेही बंद असून दूध उत्पादकांचेही नुकसान होत आहे. 

राज्य शासनाने दुधाला 5 रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अहिरे, ता. खंडाळा ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायतीसमोर रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. 

कातरखटाव येथील युवा शेतकरी वर्गाने परिसरातील दूध संकलित करून त्या दुधापासून बासुंदी तयार करून परिसरात त्याचे वाटप केले. पंढरीच्या वारीला जाणार्‍या दिंडीतील वारकर्‍यांनाही त्यांनी दुधाचे वाटप करून दुधाला हमीभाव मिळावा आणि शेतकरी वर्ग समाधानी राहावा, म्हणून विठ्ठलाच्या चरणी साकडे घालावे, अशी विनंतीही शेतकर्‍यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास माण तालुक्यातील शेतकर्‍यांनी पाठिंबा दिला असून तालुक्यातून दररोज सुमारे 70 हजार लिटर दूध संकलन होत असते ते बंद असून कोट्यवधी रूपयांचे नुकसान शेतकरी वर्ग सोसत आहे. काही ठिकाणी वारकर्‍यांना दूध दिले जात असून शिल्लक दूधाचे करायचे काय? असाही प्रश्‍न अनेक दूध उत्पादकांना पडला आहे.

दरम्यान, दूध उत्पादकांना आंदोलनामुळे शिल्लक दुधाचे करावयाचे काय? असा प्रश्‍न पडला असून दुग्ध व्यवसायिकांनाही दूध आंदोलनाचा फटका बसला असून दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन थांबले आहे. त्यामुळे अर्थात शेतकर्‍यांचे तसेच व्यवसायिकांचेही लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

करवडीत दुधाने अंघोळ; वाठार-रेठरेत दूध ओतले

कराड : प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) तालुक्यात दूध बंद आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होऊ लागले आहे. पहिले दोन दिवस शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाने आक्रमक होत अक्षरश: दुधाने अंघोळ केली. करवडी येथील हनुमान मंदिरात बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. तर वाठार येथे मंगळवारी रात्री रस्त्यावर दूध ओतण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील दूध संकलन तिसर्‍या दिवशीही जवळपास ठप्पच झाल्यासारखी स्थिती पाहावयास मिळत आहे.

तालुक्यात दूध बंद आंदोलनामुळे दररोज होणारे 80 हजार लिटरचे दूध संकलन जवळपास ठप्पच झाले आहे. कोयना दूध संघाच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे सोमवारपासून बुधवार सकाळपर्यंत 200 लिटरच्या घरात होणारे दूध संकलन होेणे अपेक्षित होते. मात्र अडीच दिवसात केवळ 25 हजार लिटरपर्यंत संकलन मर्यादित राहिले आहे. यावरूनच दूध बंद आंदोलनास मिळालेला प्रतिसाद लक्षात येत आहे. 

एकीकडे अशी स्थिती असताना करवडी येथे शेतकर्‍यांनी घरातील हनुमान मंदिरात अभिषेक घातला. तसेच त्याच दुधाने आंघोळ करत अनोख्या प्रकारे शासनाचा निषेध नोंदवला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे स्वाभिमानी अथवा अन्य शेतकरी संघटनांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला याची माहिती नव्हती. त्यामुळेच शेतकरी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे. तर वाठार - रेठरे मार्गावर वाठार गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री दूध रस्त्यावर ओतण्यात आले. बुधवारी दुपारी याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या ‘दूध बंद’ आंदोलनास कराड तालुक्यात दोन दिवस संयम ठेवत आंदोलन करण्याचा निर्णय यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणे सचिन नलवडे यांनी मंगळवारी सकाळी अडवलेले दूध वाहतूक करणार्‍या वाहनाचा अपवाद वगळता तालुक्यात कोठेच अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र त्यानंतरही तालुक्यात दोन दिवसात केवळ 17 ते 18 हजार लिटरच दूध संकलन झाले होते. तर बुधवारी सकाळी 40 हजार लिटर दुधापैकी केवळ 7 ते 8 हजार लिटर दुधाचेच संकलन झाले आहे. त्यामुळेच कराड शहर व परिसरात दुधाचा तुडवटा जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

कराडात झोपडपट्टीसह गावोगावी दुधाचे वाटप ....

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी दूध रस्त्यावर ओतण्यापेक्षा कराड झोपडपट्टी परिसरात नागरिकांना दुधाचे वाटप केेले. त्याचबरोबर कोपर्डे हवेलीसह तालुक्यातील विविध गावातही दोन दिवसांपासून लोकांना दुधाचे वाटप केले जात आहे.