Mon, Jun 17, 2019 02:24होमपेज › Satara › भरतीच्या स्वप्नासाठीरात्र फुटपाथवर

भरतीच्या स्वप्नासाठीरात्र फुटपाथवर

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 10:20PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

देशसेवेचं उराशी बाळगलेलं स्वप्न सोबत घेत सैनिकांच्या सातारा जिल्ह्यात हजारो तरुण येऊ लागले आहेत. भरतीच्या स्वप्नांची रात्र फुटपाथवर काढत हे जवान सैन्य भरतीसाठी सामोरे जात आहेत. जिल्ह्यात सात  वर्षानंतर सैन्य भरती होत असल्यामुळे  सातार्‍यात जणू सैन्य भरतीचा माहोल तयार झाला आहे.  

सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर मार्फत 8 ते 18 डिसेंबर  अशी 10 दिवस सैन्य भरती सातार्‍यात होत आहे. सातार्‍यातील छत्रपती शाहू स्टेडियम आणि पोलिस परेड ग्राऊंड येथे सैन्य भरती होत आहे. बाहेरच्या जिल्हयातून  असंख्य अडचणींचा सामना करुन आलेले तरुण सातार्‍यात दोन्ही मैदानाच्या ठिकाणी दिसत आहेत. 

गुरुवारी रात्री  एसटी स्टँडमधून हजारो मुले आपली भरती कोणत्या मैदानावर  आहे, हे शोधण्यासाठी धडपडत होती. पाठीवर बॅगा टाकून एका लाईनमध्ये हे युवक मैदानस्थळी पोहचत होते. शुक्रवारी रात्री 12 पासून पहिला राऊंड सुरु होणार होता. त्यामुळे रस्त्यावरच प्रशासनाने लावून दिलेल्या रांगेत ही मुले उभी होती. ज्यांची मध्यरात्री व पहाटे भरती सुरु होणार होती ते तरुण रस्त्याच्या कडेलाच पोटाला आधार देण्यासाठी  सोबत आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेत होते. काहीजण बॅगमधून आणलेल्या गोधडीपासून थंडीचा बचाव करत होते तर काहीजण भरतीच्या अगोदरच्या वेळेचा ‘अलाराम’ मोबाईलला लावून काहीवेळ वामकुक्षी घेत होते. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग, गोवा या जिल्ह्यातील तरुणांना संधी दिली होती. 

सकाळपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे मुले रात्रीच सातार्‍यातील दोन्ही मैदानाच्या परिसरात गर्दी करत आहेत.  सैन्य भरतीसाठी गावागावातील तरुण एक स्पेशल वाहन करुन मैदानस्थळी पोहचत आहेत. त्यामुळे मैदानाच्या परिसरात अनेक खाजगी वाहनेही दिसून येत आहेत.  मैदानाच्या परिसरात पोहचल्यानंतर आपली भरती प्रक्रिया कधी होणार आहे? भरती प्रक्रियेचे मुख्य गेट कोठे आहे? आदि प्रश्‍नांची विचारपूस करत हे तरुण मैदानाच्या ठिकाणी जात आहेत. मैदानातील भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर काहीजण निराश होऊन बाहेर येत आहेत तर काहीजण आपल्याला लवकरच देशसेवा करण्याची संधी मिळणार या आनंदात मैदानातून बाहेर येत आहेत.

पोलिसांचा चोख बंदोबस्त 

सात वर्षानंतर सैनिकांच्या सातारा जिल्ह्यात भरती होत असल्यामुळे अवघ्या सातार्‍याचा माहोलच बदलला आहे. सातार्‍यातील छत्रपती शाहू मैदान व पोलीस परेड ग्राऊंडवर राज्यातील विविध जिल्ह्यातून हजारो तरुण आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सातार्‍यातील भरतीसाठी सर्व यंत्रणा अद्यावत केली आहे. भरतीच्या ठिकाणी पोलिस व सैनिकांचा कडक बंदोबस्त असून त्या ठिकाणी इतर कोणालाही फिरकू दिले जात नाही. तसेच दररोज सातारा पोलिस दलातील अधिकारी दोन्ही मैदानावर जाऊन पाहणी करत आहेत.