Thu, Jul 18, 2019 02:18होमपेज › Satara › जावयाकडून सासूचा निर्घृण खून

जावयाकडून सासूचा निर्घृण खून

Published On: Mar 23 2018 10:30PM | Last Updated: Mar 23 2018 10:29PMम्हसवड : प्रतिनिधी

शिवाजीनगर, कुक्कूडवाड (ता. माण) येथे गुरुवारी रात्री जावयाने  सासूवर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. याच वेळी त्याने पत्नीवरही वार केले. या हल्ल्यात सासू जागीच ठार झाली, तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला म्हसवड येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. रंजना हणमंत भोसले (वय 55, रा. म्हसवड) असे खून झालेल्या सासूचे नाव असून वैशाली काटकर असे जखमी पत्नीचे नाव आहे. आबासो बबन काटकर (वय 40) असे संशयिताचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी, नरवणे (ता. माण) येथील आबासो काटकर हा ठाणे येथील दिवा परिसरात पत्नी वैशाली व दोन लहान मुलांसह राहत असून तो बीएसटीत इलेक्ट्रिकल विभागात नोकरीला आहे. पत्नी वैशाली व त्याच्यात काही वर्षे वाद आहे. दि. 20 रोजी तो अचानक पत्नी-मुलांसह गावी नरवणे येथे आला. पत्नीचा मामाही नरवणे येथे असल्याने पत्नी मामाकडे गेली. पती-पत्नीमध्ये भांडण झाले असल्याने मामाने भाची वैशालीस शिवाजीनगर (कुक्कूडवाड) येथे माहेरी आईकडे पाठवली.

गुरुवारी (दि. 22) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वैशाली काटकर, तिची आई रंजना व वहिनी पूनम भोसले या तिघी अंगणात लसूण सोलत बसल्या होत्या. यावेळी आबासो काटकर त्या ठिकाणी आला. त्याने ‘मला घटस्फोट हवा आहे, तू मला पसंत     नाहीस,’ असे म्हणत वैशाली व सासू रंजना यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. सासू रंजना यांनी शिव्या देवू नका असे त्याला सांगितल्यानंतर चिडून जावून आबासो याने रंजना यांच्या गळ्यावर चाकू धरला. यावेळी पुनम भोसले व वैशाली सोडवण्यास गेल्या. त्यांंनाही दमदाटी करत आबासो काटकरने त्या दोघींना ढकलून दिले व सासू रंजना यांना गळ्याला धरुन घरात नेले. तिघींच्या आरडाओरड्याने शेजारील पुनम भोसलेंच्या चुलत सासू सुनिता तेथे आल्या. त्या सर्वांनी आत जावून रंजना यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आबासो याने रंजना यांच्या छातीवर, मानेवर, कपाळावर, हातावर चाकूने सपासप वार केले. तसेच पत्नी वैशालीवरही सपासप वार केले. त्या दोघींना सोडवण्यास गेलेल्या पूनम भोसले आणि सुनीता यांनाही मारहाण केली. यानंतर चाकू टाकून तो पसार झाला. या हल्ल्यात सासू रंजना यांच्यावर तब्बल 11 वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्या जागीच ठार झाल्या तर पत्नी  वैशालीही गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी संशयीतास तत्काळ अटक केली असून  म्हसवड पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत. 
दरम्यान, शुक्रवारी सकाळी 10वाजता शिवाजीनगर येथे शोकाकूल वातावरणात रंजना यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.