Wed, May 22, 2019 20:36होमपेज › Satara › तहानलेल्या गावात बिअरसाठी ग्रामसभा

तहानलेल्या गावात बिअरसाठी ग्रामसभा

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 1:43AMम्हसवड : पोपट बनसोडे

माण तालुक्यातील जांभुळणी ग्रामपंचायतीने दि. 6 रोजी ‘विशेष’ ग्रामसभेचे आयोजन केले आहे. तथापि, पाणीटंचाईसह अनेक प्रश्‍न गंभीर असताना फक्त बियरबार व परमीटरूमला ना-हरकत दाखला देणे या एकमेव कारणासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. गाव तहानलेले असताना भलताच विषय अजेंड्यवर घेतल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. 

हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भोजलिंगाची पावन भुमी असलेले जांभुळणी गाव आहे. तीन हजार लोकसंख्येच्या या गावात कायम दुष्काळी परिस्थिती असते. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील अनेक कुटुंबं ऊस तोड कामगार म्हणून किंवा इतर कामासाठी इतर जिल्ह्यात जात असतात. पाण्याच्या दुर्भीक्ष्यासह इतरही समस्या गावाला भेडसावत आहेत. गावच्या हद्दीत भोजलिंग डोंगरावर हजारो भाविक दर्शनाला येत असतात.

या मंदिराकडे जाणारी वाट बिकट बनली आहे. सामाजिक संस्थांनी या रस्त्यावर मुरूम टाकला आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था असल्याने भाविकांचे हाल होत आहेत. तसेच दिवाबत्तीची बोंबाबोंब तर अंतर्गत रस्त्याचीही दयनीय अवस्था आहे. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात गाव सापडले आहे. जांभुळणी ग्रामपंचायतीने मात्र या समस्यांऐवजी चक्क बियरबार व परमीटरूम ना-हरकत दाखला देणे या एकमेव कारणासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे.

त्यामुळे दारू पाजून कुटुंबे उद्ध्वस्त करण्याचे मनसुभे रचणारा हा गावदादा कोण आहे. केवळ त्याच्या एका विषयासाठी विशेष ग्रामसभा घेतली जात आहे. या विषयाच्या मोहजाळ्यात कोण कोण मासे गळाला लागले आहेत. याबाबत जांभुळणी परिसरात जोरदार चर्चा असून मंगळवारच्या सभेकडे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची अब्रू वेशीवर टांगली आहे. या सभेसाठी गावातून ग्रामस्थांचा विरोध वाढू लागला आहे. परगावी असलेले युवकही एकवटले असून सभा उधळून लावण्याचा निश्‍चय तरुण व्यक्त करत आहेत.