Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Satara › क्षेत्र मेरूलिंग पर्यटनाचे नवे दालन 

क्षेत्र मेरूलिंग पर्यटनाचे नवे दालन 

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 10:25PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील सायगाव विभागातील प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ क्षेत्र मेरूलिंगचे धार्मिक व ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण असून पर्यटनाचे नवे दालन म्हणून हा परिसर आता विकसित होऊ लागला आहे. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषत: श्रावण महिन्यात भाविकांचा ओघ वाढत असून या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. 

क्षेत्र मेरुलिंग हे सायगाव विभागातील पर्यटनाचे केंद्र बनले आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून उंच पर्वतावर हे देवस्थान आहे. क्षेत्र मेरूलिंग पर्वतावर प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे. तसेच ‘बंडा’ नावाचे विस्तीर्ण पठारही आहे. पाचगणीच्या टेबललँडपेक्षाही विस्तीर्ण असलेले हे पठार प्रसिध्दी माध्यमांपासून कोसो मैल दूर आहे. नैसर्गिक सौंदर्याचे भरभरून वरदान लाभलेल्या या पर्यटनस्थळावर अद्यापही विविध सुविधांची वानवा आहे.

येथील घाट रस्त्यांवर संरक्षक कठड्यांचा अभाव असल्याने वर्षानुवर्षे येथील वाहतूक धोकादायक असून हा घाटरस्ता डेंजरझोन बनला आहे.  अति तीव्र उतारामुळे वाहनांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. या पर्यटनस्थळी येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या मार्गावर तातडीने संरक्षक कठडे उभारण्याची मागणी ग्रामस्थ, भाविक व पर्यटकांकडून होत आहे.

पर्यटनस्थळाचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व अबाधित

मेरूलिंग हे नव्याने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणून पुढे येवू लागले आहे. सायगाव विभागातील या पर्यटनस्थळाचे धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिक महत्व आजही अबाधित आहे. मात्र, डोंगर कड्यावर असणारे हे ठिकाण प्रसिद्धीपासून वंचित राहिले आहे. येथील पर्यटनाचा लौकिक हळूहळू सर्वदूर पोहोचू लागल्याने पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. नजिकच्या काळात हे पर्यटनस्थळ आणखी विकसित होण्याची चिन्हे आहेत.