Tue, Apr 23, 2019 13:34होमपेज › Satara › श्री क्षेत्र मेरूलिंग श्रावणी सोमवार विशेष

श्री क्षेत्र मेरूलिंग श्रावणी सोमवार विशेष

Published On: Aug 27 2018 1:18AM | Last Updated: Aug 26 2018 8:41PMइम्तियाज मुजावर, कुडाळ
 

जावली तालुक्यात खर्‍या अर्थाने पर्यटनस्थळ व पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून अल्पावधीत नावारुपाला आलेले श्री क्षेत्र मेरुलिंग. सायगाव विभागातील हे पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचीवर असून या पर्यटनाला ‘क’ दर्जा मिळाला आहे. तमाम भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून नावारुपाला आलेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगची धार्मिक महती आता सर्वदूर पोहोचली आहे. त्याचबरोबर येथील परिसराला लाभलेली निसर्ग सौंदर्याची भरभरुन खाण पर्यटकांनाही साद घालत आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी याठिकाणी उत्सव साजरा होत असतो. त्यानिमित्त....

श्रावण महिना म्हटले की, दर सोमवारी येथे राज्यभरातून पर्यटक येथील देवाच्या दर्शनाबरोबर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. चांगला रस्ता असल्यामुळे चारचाकी वाहनेही मंदिराजवळ जातात. मंदिराकडे जाताना सर्वप्रथम उजव्या हाताला तीर्थकुंड लागते. ही कुंडे पाहताना श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथील पाच नद्यांच्या उगमस्थानाचे ठिकाण आठवते. या ठिकाणच्या तिन्ही तळ्यात कायमस्वरुपी पाणी असते. पुढे पायर्‍या चढून गेल्यानंतर अत्यंत सुबक कमानीतून मंदिरात गेल्यावर मन प्रसन्न होते. मेरुलिंग हे देवस्थान जागरुक असून 400 वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर अत्यंत आकर्षक आहे. हे पांडवकालीन मंदिर पाहून मन प्रसन्न होते. वास्तूशास्त्रानुसार बांधलेल्या मंदिराच्या चारही बाजूला मजबूत तटबंदी आहे. 

मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या चारी दिशांना असणार्‍या डोंगराच्या खिंडीत चार गणपती मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या भोवती उंच व भव्य दगडी भिंत आहे. समोर व पाठीमागे महाद्वार आहेत. मंदिरासमोर एक उंच दीपमाळ व दोन उंच दगडी दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या मधल्या सभागृहात  गाभार्‍यात नक्षीकाम केलेली दगडी चौकट लागते. त्यात मध्यभागी देवाची मूर्ती व तिच्या दोन्ही बाजूला हत्तीच्या मूर्ती पाहण्यास मिळतात. गाभारा खोल असून त्याच्या मध्यभागी श्री महादेवाची स्वयंभू पिंड आहे. पिंड शाळूंखाची असून खडबडीत आहे. या पिंडीभोवती पाच फणा असलेल्या नागाची मूर्ती बसवली आहे, त्यामुळे प्रत्येक भाविकाला आत आल्यानंतर आत्मिक समाधान मिळते. चिमाजी आप्पा यांनी मंदिराला 400 किलो वजनाची पंचधातूची घंटा दिली होती. आजही ती येथे पाहण्यास मिळते. मंदिर परिसरात धर्मशाळा आहे. 

पूर्वी येथे साधू ध्यानास बसत असत. ब्रह्मेंद्रस्वामी, बंकरस्वामी, कोलेकरस्वामी, रेवडीकर अण्णा, शिवरामस्वामी, धुंदीबाबा यांनीही येथे वास्तव्य केले आहे. मंदिराच्या पश्‍चिमेला दोन ते तीन किलोमीटर परिघाचे महाकाय बंडा नावाचे पठार पाचगणीच्या टेबल लॅण्डची आठवण करुन देते. येथून कण्हेर धरणाच्या जलाशयाचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडते. पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे येथून जिल्ह्यातील अजिंक्यतारा, सज्जनगड, पांडवगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, वैराटगड हे किल्ले दिसतात. या मंदिराच्या पुढच्या खिंडीत व मागच्या खिंडीत एकावर एक मोठमोठे रचलेले दगड आहेत. त्याला रुप गवळणी म्हणतात. ब्रह्मेंद्रस्वामी यांची मेरुलिंग ही तपोभूमी होती. 17 व्या शतकात शाहू महाराज ब्रह्मेंद्रस्वामींच्या दर्शनाला येथे यायचे. तेव्हा सल्लामसलतीतून त्यांनी येथील शिवमंदिरास जीर्णोद्धारासाठी एक लाख दहा हजार रुपये खर्च केला होता. त्यानंतर चित्रपट निर्माते मधुकर अण्णा देशपांडे यांनी स्वखर्चातून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून या देवस्थानला पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळाला आहे. येथील पंचायत समिती सदस्या हभप सौ. जयश्री गिरी व त्यांचे पती माजी सभापती हभप सुहास गिरी यांचे विकासकामांबाबत मोलाचे योगदान ग्रामस्थांना मिळते. 

याशिवाय परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती व भाविकांनी आपापल्या परीने क्षेत्रमेरुलिंग देवस्थानसाठी कमी अधिक योगदान दिले आहे. 

या पर्यटनस्थळासह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सौ. जयश्री गिरी व सुहास गिरी यांच्या माध्यमातून  आश्‍वासक कामे उभी राहिली असल्याने भाविक व स्थानिक जनता त्यांना धन्यवाद देत असते. श्रावणी सोमवारी या पर्यटनस्थळावर भाविक व पर्यटकांची  रिघ लागत असून अलिकडे हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून सर्वदूर पोहोचले आहे.