Mon, Jul 22, 2019 14:07होमपेज › Satara › दांडीबहाद्दर अधिकार्‍यांमुळे सदस्य संतप्त

दांडीबहाद्दर अधिकार्‍यांमुळे सदस्य संतप्त

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 23 2018 11:49PMसातारा : प्रतिनिधी

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्‍यासह अन्य अधिकारी उपस्थित न राहिल्याने सदस्य संतप्त झाले. दरम्यान, विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या हॉलमध्ये पार पडली. सभेस उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील व  खातेप्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीलाच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्‍यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सदस्य संतप्त झाले. ही सभा अधिकृत असताना अधिकार्‍यांनी दांडी मारणे चुकीचे आहे. येथून पूढे सर्व अधिकार्‍यांनी सभेला उपस्थित रहावे, अशा सूचना संजीवराजे ना. निंबाळकर यांनी दिल्या.

200 फुटाच्या खाली शासकीय बोअर मारता येत नाही. मात्र पाण्याची पातळी 200 फुटाच्या खाली गेली आहे. त्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी उदयसिंह पाटील यांनी केली. शेते येथे नदीवर बंधारा असून बंधार्‍यावर फळ्या लावण्याची मागणी  वसंतराव मानकुमरे यांनी केली. कराड चिपळूण, सातारा कोरेगाव रस्त्याच्या रूंदीकरण कामासाठी दोन्ही बाजूची झाडे मोठ्या प्रमाणात तोडली आहेत.त्यासाठी बांधकाम विभागाने झाडे लावण्यासंदर्भात बैठका घ्याव्यात. सामाजिक वनीकरणाकडे मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध असून त्याचा वापर वृक्षारोपणासाठी करण्याची मागणी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली. पाचवड ता.खटाव येथील खैराच्या झाडाची तोड करून 3 ट्रक माल गेला आहे याची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याची मागणी  सुरेंद्र गुदगे यांनी केली.

यावेळी जलसंधारण, सामाजिक वनीकरण, वन विभाग, भुजल सर्वेक्षण, लघुपाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महावितरण, संपूर्ण स्वच्छता विभागाचा आढावा घेण्यात आला. 

दरम्यान, स्थायी समितीची सभा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विषयपत्रिकेसह ऐनवेळच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. प्राथमिक शिक्षकांच्या रोस्टरमध्ये चुका असून त्या चुकांची दुरूस्ती तत्काळ करून रोस्टरची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना पदाधिकार्‍यांनी केली.