Mon, May 20, 2019 08:03होमपेज › Satara › सातारा नगरपालिकेत साविआकडून खांदेपालट

सातारा नगरपालिकेत साविआकडून खांदेपालट

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:45PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा विकास आघाडीने सभापती व विषय समित्यांच्या सदस्य निवडीत खांदेपालट केला. पाणीपुरवठा  सभापतिपदी श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापतिपदी यशोधन नारकर, बांधकाम सभापतिपदी मनोज शेंडे, नियोजन समिती सभापतिपदी स्नेहा नलावडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अनिता घोरपडे यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीमध्ये साविआने गटनेत्या सौ. स्मिता घोडके व अ‍ॅड. डी. जी. बनकर यांना तर नविआने शेखर मोरे-पाटील यांना संधी दिली.

सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सभापती व विषय समित्यांमधील सदस्य निवडींचा कार्यक्रम शनिवारी दुपारी पार पडला. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे इच्छुक नगरसेवकांनी सभापती, विषय समिती सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया पार पडल्यावर पिठासीन अधिकारी तथा सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, 
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या विशेष सभेत सभापती व विषय समित्यांच्या सदस्यांनी नावे जाहीर करण्यात आली. श्रीकांत आंबेकर यांना पूर्वीचा पाणीपुरवठा विभागाचा अनुभव आहे. स्नेहा नलवडे यांनी बांधकाम तसेच महिला व बालकल्याण हे दोन्हीही विभागाचे कामकाज पाहिले आहे. दोन्हीही अनुभवी सभापती असले तरी त्यांना यशोधन नारकर, मनोज शेंडे, अनिता घोरपडे व संगीता आवळे यांना  सर्वांना विश्‍वासात घेवून काम पहावे लागणार आहे.

स्थायी समितीमध्ये साविआने स्मिता घोडके तसेच अ‍ॅड. बनकर यांना संधी दिली असून नगर विकास आघाडीने गोडोलीतील शेखर मोरे-पाटील यांना संधी देवून शह देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील स्थायीच्या बैठका प्रचंड गाजण्याची चिन्हे आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक समारंभाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सुजाता राजेमहाडिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. निशांत पाटील पक्षप्रतोद म्हणून काम पाहणार आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नूतन पदाधिकार्‍यांना सभागृहात येवून शुभेच्छा दिल्या. त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांसोबत चर्चा करुन कामकाजाबाबत सूचना केल्या. दरम्यान, सभागृहात भाजपचे सर्व 6 नगरसेवक विरोधी बाकावर आहेत. मात्र, सत्तारुढ आघाडीकडून भाजप नगरसेवकाला आरोग्य सभापतीपद दिले जाणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती. भाजपच्या संबंधित नगरसेवकाने सभापतीपदाचा अर्जही नेला होता. त्यामुळे भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थताही वाढली होती. मात्र, सभापती निवडीवेळी साविआ नगरसेवकांनीच अर्ज दाखल केले.

उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांवर संक्रांत 

उपनगराध्यक्ष बदलण्याच्याही हालचाली साविआत सुरू आहेत. स्वीकृत नगरसेवकांच्या साविआकडे असलेल्या दोनपैकी एक जागा बदलण्याची शक्यता आहे. नगर विकास आघाडी तसेच भाजपकडे प्रत्येकी एक असलेले स्वीकृत नगरसेवक बदलले जाण्याची शक्यता आहे. संक्रांतीनंतर दि. 15 रोजीपर्यंत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केला जाऊ शकतो.