Wed, Mar 27, 2019 00:03होमपेज › Satara › ‘जलयुक्‍त’मध्ये अन्याय झालेल्या गावांतील पदाधिकार्‍यांची उद्या बैठक

‘जलयुक्‍त’मध्ये अन्याय झालेल्या गावांतील पदाधिकार्‍यांची उद्या बैठक

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:24PMऔंध : वार्ताहर

सातारा जिल्ह्यातील 210 गावांवर जलयुक्‍त शिवार योजनेतील कामांबाबत मोठा अन्याय झाला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 210 गावांतील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक बुधवारी (दि.24) औंध येथे आयोजित केली असल्याची माहिती येथील राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांनी दिली.

शासनाने जलयुक्‍त शिवार योजनेमध्ये 2016-17 सालामध्ये सातारा जिल्ह्यातील 210 गावांची निवड केली होती. मूळ आराखड्यामध्ये मंजूर 11009 कामे प्रस्तावित होती. त्यासाठी आवश्यक निधी 387 कोटी 55 लाख असा होता. हा आराखडा तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केला होता. त्यानुसार प्रस्तावित कामे तांत्रिक, प्रशासकीय मंजूर करण्यात आली होती. परंतु विद्यमान जिल्हाधिकारी यांनी यामध्ये बदल करून 2016-17 चा सुधारित आराखडा तयार केला आहे.

त्यामध्ये 5478 कामे अंतिम करून त्याकामांसाठी 202  कोटी 57 लाखाचा अंतिम आराखडा मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्याच्या मूळ आराखड्यातील जलतूट बेकायदेशीररित्या कमी करून कामे देखील मोठ्या प्रमाणात कमी केली आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील या गावांचे मोठे नुकसान होणार असल्याचे जगदाळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

वरील गावांच्या जलतुटीनुसार मूळ आराखड्याची आवश्यक कामे न करताच ही गावे फक्त कागदावरच जलयुक्त शिवार दाखवण्याचा शासनाचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी बुधवार दि.24 रोजी औंध येथील कला मंदिर येथे दुपारी एक वाजता जिल्ह्यातील 210 गावांमधील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. संबंधित गावातील पदाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.