Wed, Jul 17, 2019 18:00होमपेज › Satara › शिक्षकांच्या प्रश्‍नांसंदर्भात लवकरच बैठक : विनोद तावडे 

शिक्षकांच्या प्रश्‍नांसंदर्भात लवकरच बैठक : विनोद तावडे 

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 8:55PMसातारा : प्रतिनिधी

यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या आघाडीच्या सरकारने शिक्षकांसाठीच्या अनेक योजना कागदावरच ठेवल्या आहेत. अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थी संख्या न पाहता फक्त शाळांची संख्या भरमसाठ करण्यात आली आहे. त्यांच्या काळात त्यांच्या योजना कागदावरच राहिल्याने शिक्षक व शिक्षक संघटनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासर्व योजना लवकरच मार्गी लावण्यात येतील. यासाठी गणेशोत्सवानंतर तातडीने बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षण व सांस्कृतिक मंत्री ना. विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांना दिली.

सातारा येथे शिक्षकदिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी शासकीय विश्रामगृह येथे त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी सातारा जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी ही पदे भरण्यात यावीत. संच मान्यता, शिक्षकेत्तर आकृतिबंध, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक मंजुरी, अनुदान व आर्थिक धोरण, शाळांचे मूल्यांकन, अशैक्षणिक काम, शालेय पोषण आहार,सातवा वेतन आयोग, माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणीतील तफावत दूर करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांची निवेदने शिक्षक संघटनांनी ना. विनोद तावडे यांना देण्यात आली.

ना. तावडे म्हणाले, आघाडी सरकारचा घोळ दुरुस्त करण्यातच बघता-बघता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. भरमसाठ शाळा झाल्याचे खापर शिक्षकावर फोडले जाते, पण त्याला कारणीभूत संस्थाचालक आहेत. शाळा सिद्धी संदर्भात आयुक्तांशी लवकरच बैठक लावून त्यावर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही देतो. गणेशोत्सवानंतर 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत सातारा जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लावून सर्व प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.