Sat, Mar 23, 2019 02:40होमपेज › Satara › कृती दलामार्फत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवा 

कृती दलामार्फत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवा 

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:37PMमुंबई/पाटण : विशेष प्रतिनिधी 

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करून प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित प्रश्‍नांचा तत्काळ निपटारा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. 

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात विधानमंडळात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या दूर करण्यासाठी वॉररूम स्थापन करणे, प्रकल्पग्रस्तांना पडीक जमिनींऐवजी पर्यायी चांगली जमीन देणे, नोकरीत प्राधान्य देणे, प्रकल्पग्रस्तांना पाणी व वीजपुरवठा करणे, तसेच धरणाच्या परिसरातील गावांमध्ये पर्यटनासाठी बोटिंग सुरू करण्याची परवानगी देणे, पर्यावरण विकास आराखडा राबविणे, पायाभूत सुविधा देणे आदी विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने येत्या तीन महिन्यात प्रकल्पग्रस्तांची माहिती गोळा करून, किती गावांतील नागरिकांची याबाबत माहिती जमा करण्याची राहिली आहे,  याचा अहवाल देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार शंभूराजे देसाई, मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेेता सिंघल, सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम, सातार्‍याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, प्रकल्पग्रस्त कृती समितीचे भारत पाटणकर यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यंमत्री सकारात्मक

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याशिवाय प्रकल्पग्रस्तांबाबत काही महत्त्वाचे निर्णयही घेतल्याची माहिती श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी कोयनानगर येथे आंदोलनस्थळी बैठकीतील निर्णय जाहीर करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दि. 26 फेब्रुवारीपासून तब्बल बावीस दिवस सुरू असलेले हे आंदोलन मंगळवारी मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. 

 

Tags : satara, satara news, Koyna dam project affected, Devendra Fadnavis, Meeting,