Wed, Feb 26, 2020 02:49होमपेज › Satara › पाच तास रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांची बैठक 

पाच तास रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांची बैठक 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 10:58PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी पंधरा हजारहून अधिक कार्यकर्त्यांच्या साक्षीने शड्डू ठोकला. राजकीय वाटचालीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उंडाळकरांचा कराडमध्ये भव्य सत्कार सोहळा पार पडला. कार्यकर्ते रणरणत्या उन्हात सुमारे पाच तासाहून अधिक काळ अक्षरश: ठाण मांडून बसले होते.

विलासराव पाटील - उंडाळकर यांचा 50 वर्षाचा राजकीय, सामाजिक कार्यकाल, भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव आणि रयत संघटनेचा सुवर्णमहोत्सव असा तिहेरी कार्यक्रम रविवारी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झाला असला तरी दुपारी एकपासून कराड दक्षिणसह जिल्ह्याच्या विविध भागातील हजारो लोक कार्यक्रमस्थळी येत होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमस्थळ गावोगावच्या कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. सूर्य देवताही रविवारी भलतीच मेहरबान झाली होती. त्यानंतरही हजारो लोक रणरणत्या उन्हाच्या झळा सोसत जमिनीवर ठिय्या मारून बसले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

प्रत्येकाला कार्यक्रम केव्हा सुरू होणार? याची उत्सुकता होती. तहसील कार्यालय परिसर तसेच बाजार समितीच्या मैदानाकडे येणारे सर्व मार्गही वाहनांच्या पार्किंगमुळे जवळपास पूर्णपणे व्यापल्याचे दिसत होते. कार्यक्रम दीड तासाने सुरू होऊन सायंकाळी सातच्या सुमारास संपला. मात्र या पाच तासांच्या कालावधीत कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना प्रोत्साहन देत होते.