Wed, May 27, 2020 09:32होमपेज › Satara › तात्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या मुलांना मदत केली ती चूक झाली का : शेखरभाऊ गोरे

तात्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या मुलांना मदत केली ती चूक झाली का : शेखरभाऊ गोरे

Published On: Apr 23 2019 1:37AM | Last Updated: Apr 23 2019 1:37AM
म्हसवड : प्रतिनिधी

माजी आमदार स्व. पोळ तात्यांसाठी आपण पक्ष , गटतट  न पाहता चांगला माणूस म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तनमनधनाने मदत केली. प्रसंगी आमच्यावर आंधळी सारख्या सोसायटी प्रकरणात गुन्हे दाखल झाले. स्वत:च्या पोरांनी जेवढे केले नसेल तेवढे तात्यांच्या प्रेमापोटी मी केले. एकाच घरातील सख्ख्या जाऊबाईंना मार्डी व गोंदवले बु. जि.प. गटातून उमेदवारी देण्याबाबत सकारात्मकता दाखवित निवडून आणल्या. एकाच घरात दोन जि.प.सदस्य अन् तेही सख्ख्या जावा हे राज्यात पहिलेच उदाहरण असेल.निवडून येईपर्यंत त्यांचे कारभारी भाऊ तुम्ही लक्ष घाला तुमच्याशिवाय आपण विजयी होणार नाही, असे म्हणणारे आज आम्ही आमच्या जीवावर जिंकून आलो आहोत, असे बोलत आहेत.पोळ तात्या हयात असताना त्यांना निस्वार्थीपणे मदत केली. तात्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनाही मदत केली ही माझी चूक झाली की काय?, अशी भावनिक प्रतिक्रिया शेखरभाऊ गोरे यांनी व्यक्‍त केली.मार्डी, जि.प. गटात माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मार्डी येथे रविवारी झालेल्या सांगता सभेत ते बोलत होते. 

शेखरभाऊ गोरे म्हणाले, पोळ तात्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना मदत करण्याबरोबरच राष्ट्रवादी पक्षालाही गतवैभव मिळवून दिले. खादी ग्रामोद्योग, खरेदी विक्रि संघ जि.प., पं.स., नगरपालिका, विविध ग्रामपंचायती, सोसायट्यांत वर्चस्व मिळवून दिले. मार्केट कमिटी समान सोडली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पदरमोड करुन कोट्यवधी रुपये घालविले. मात्र, राष्ट्रवादीतीलच काहींच्यामुळे तात्यांचा पराभव झाला.

खरेदी विक्री संघाच्या वेळी माझ्या अनुपस्थितीत मला विश्‍वासात न घेता तात्यांच्या धाकट्या मुलाने पॅनेल टाकले. मात्र, काही दिवसातच विरोधक डोईजड होऊ लागल्याचे समजताच पुन्हा एकदा त्यांना मी आठवलो. माझ्याकडे येऊन तुम्ही लक्ष घाला नाहीतर एकही जागा मिळणार नाही म्हटले. मीही पक्षासाठी लक्ष घालून संघावर निर्विवाद वर्चस्व मिळविले. म्हणजे पैसा, ताकद ज्यावेळी लागेल त्यावेळी त्यांना शेखर गोरे आठवतो पण श्रेय घ्यायला नाही आठवत. ज्याने साधी ग्रामपंचायत लढवली नाही त्याच्या पाठीमागे फिरणारे आज  केलेले उपकार विसरून गेले आहेत. एवढे करुनही त्यांच्याबरोबरच पक्षातील नेतेमंडळी व पक्षानेही आपल्याला सापत्नपणाची वागणूक दिली आहे.

याच मार्डी गटातील काही गावांना धोम बलकवडीचे पाणी येणार होते तेही पाणी रामराजेंनी घाटाखाली पळवून नेले आहे. माण खटाव तालुक्याला वरदायी ठरणार्‍या सिंचन योजना रखडवण्याचे पापही याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने केले आहे. त्यामुळेच आपण राष्ट्रवादीच्या विरोधात बाहेर पडलो असून माण खटाव तालुक्याला वरदायी ठरणार्‍या जिहे-कठापूर, उरमोडी, टेंभू, तारळी, ब्रम्हपुरी योजनांना भरीव निधी आणण्यासाठी व त्या योजना मार्गी लावून माण खटाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी महायुतीसोबत राहिलो आहे. 

शेखरभाऊ गोरे म्हणाले, स्व. पोळ तात्यांच्या सहवासात आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला बळ देत जिल्हा बँक, मार्केट कमिटी, जि.प.,पं.स., खादी ग्रामोद्योग, खरेदी विक्री संघ, म्हसवड नगरपालिका, विविध ग्रामपंचायती, सोसायट्या आदी निवडणूकांत कोणाचीही मदत न घेता कोट्यवधी रुपयांची पदरमोड करून निवडणूका लढवून जिंकल्या आहेत. शेखर कडील पैसे संपले म्हणणारे संपून जातील. माझ्या पैशांची कोणीही काळजी करू नका. मी सर्वांना पुरून उरेन त्यामुळे माझ्या नादाला लागू नका.रामराजेसाहेब, जि.प.निवडणुकीवेळी प्रत्येक गटाला व विधानपरिषदेला पक्षाची मदत करतो म्हटले होते ती केली का अगोदर सांगा. रामराजेंना माण, खटावचा आमदार राष्ट्रवादीचा होऊ द्यायचा नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. स्व. पोळ तात्यांना विधानसभेला व जिल्हा बँकेला पाडण्यातही रामराजेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना माण खटावमध्ये त्यांचा होल्ड ठेवायचा आहे. त्यांनाच या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार होऊ द्यायचा नाही. त्यामुळे माण खटावच्या राजकारणात जोपर्यंत रामराजे लक्ष घालून आहेत तोपर्यंत माण खटावचा राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकत नाही,असेही शेखरभाऊ गोरे यांनी सांगितले.