Sun, May 26, 2019 09:45होमपेज › Satara › अतिक्रमणांबाबत फेब्रुवारीत बैठक

अतिक्रमणांबाबत फेब्रुवारीत बैठक

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 9:03PMकराड : प्रतिनिधी 

दोन वर्षापूर्वीच्या प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. याप्रश्‍नी 3 फेब्रवारीला बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर अतिक्रमणाबाबत ठोस कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाने आंदोलक बाळकृष्ण पाटील यांना दिले आहे.

ढेबेवाडी फाटा परिसरातील पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतचे फूटपाथ आणि कराड - ढेबेवाडी मार्गालगतच्या फुटपाथवरील अतिक्रमणे काढण्यासाठी दोन वर्षापूर्वी, 28 जानेवारी 2016 रोजी कराडचे तत्कालीन प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प अभियत्यांनी लेखी आदेश दिला होता. तत्पूर्वी बाळकृष्ण पाटील यांनी 26 जानेवारी 2016 ला उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पाटील यांच्याशी चर्चा करून प्रांताधिकारी पवार यांनी अतिक्रमणे काढण्याबाबत सूचना केली होती. तसेच जे लोक अतिक्रमणे काढताना विरोध करतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असेही या सूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प अधिकार्‍यांकडूनही प्रांताधिकार्‍यांना लेखी पत्राद्वारे कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यामुळेच कारवाई होईल, अशी अपेक्षा पाटील यांना होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी तसेच महामार्ग देखभाल अधिकार्‍यांकडून अतिक्रमणे काढण्यात आलेली नाहीत. पाटील यांनी गेल्या दोन वर्षात याबाबत वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. मात्र त्याकडेही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने पाटील यांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देत प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी पाटील यांच्याशी चर्चा करत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या उपस्थितीत बांधकाम विभाग, महामार्गाचे अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन बाळकृष्ण पाटील यांना दिले आहे.