Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Satara › औषध विक्रेत्याला ठाणे येथून अटक

औषध विक्रेत्याला ठाणे येथून अटक

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 09 2018 1:30AMसातारा : प्रतिनिधी

गर्भपात औषध साठा सापडल्यानंतर पुढील साखळी सापडत नसल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध करताच रविवारी या प्रकरणातील विलास पांडुरंग देशमुख (वय 64, मूळ रा. मायणी ता. खटाव सध्या रा. मलकापूर, ता. कराड) या औषध विक्रेत्याला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने ठाणे येथून अटक केली. तो मुंबई, पुणे येथे औषध विक्रीचे काम करत असल्याचे समोर येत आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील ही दुसरी अटक असून आता अटकसत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिरापूर (ता. सातारा) गावच्या हद्दीत 15 दिवसांपूर्वी गर्भपात औषधांचा साठा सापडल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याच्या नाट्यावरुन चार दिवस हे प्रकरण अधांतरीच होते. अखेर तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे रा.हिरापूर), प्रशांत नामदेव शिंदे (रा. अंबेदरे रोड) व विलास पांडूरंग देशमुख (रा. मलकापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल होण्यासाठी विलंब झाल्याने संशयित चौघांनी त्याचा पुरेपुर फायदा उठवत ते पळून गेले. तालुका पोलिसांच्या या उद्योगामुळे अखेर या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला. एलसीबीकडे तपास येताच या विभागाने सातार्‍यातील बाळासाहेब देशमुख या मेडिकलमध्ये काम करणार्‍या कामगाराला अटक करुन पहिला दणका दिला. सध्या हा संशयित आरोपी जेलमध्ये आहे. एलसीबीच्या या कारवाईनंतर मात्र पुढे कारवाई सरकत नव्हती. यामुळे दै.‘पुढारी’ शनिवारीच या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नसल्याचे वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली असता शनिवारी विलास देशमुख या संशयिताला अंबरनाथ (जि. ठाणे) येथून ताब्यात घेण्यात आले.

विलास देशमुख या संशयिताला सातारा येथे  आणल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 11 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विलास देशमुख याला अटक झाल्याने त्याच्याकडून आणखी साखळी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण? हे त्याच्याकडून समोर येण्यास मदत होणार आहे. याशिवाय आणखी तिघे पसार असून त्यांची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे एलसीबीच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्‍हाड, पोलिस हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

Tags : satara, satara news, Abortion Medicine case, Medicine Seller, Arrested,