Sun, Jul 21, 2019 05:40होमपेज › Satara › लोकशाहीत माध्यमांना स्वातंत्र्य हवे : जयदेव डोळे

लोकशाहीत माध्यमांना स्वातंत्र्य हवे : जयदेव डोळे

Published On: Aug 24 2018 12:48AM | Last Updated: Aug 23 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी

भारतातील माध्यमांवर सरकार दबाव आणत असले तरी परदेशी पत्रकारांच्या माध्यमातून येथील प्रत्येक घटनेची माहिती आज जागतिक स्तरावर पोहोचत आहे. देशातील लोकशाही बळकट करावयाची असेल तर  येथील माध्यमांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार  जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.

परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती यांच्यावतीने येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये कॉ. शेख काका व शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन अभिवादन सभा कार्यक्रमात  ‘शासन, समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी दत्तप्रसाद दाभोलकर, विजय मांडके, कॉ. वसंत नलवडे व मान्यवर उपस्थित होते.

जयदेव डोळे म्हणाले, इंग्रज सरकार देशात कार्यरत असताना त्यांनी माध्यमांसाठी कायदे केले होते. आज त्याच कायद्यानुसार देशातील माध्यमांची अप्रत्यक्ष मुस्कटदाबी करण्याचे काम सरकारच्यावतीने केले जात आहे. देशातील वृत्त वाहिन्यांवर प्रसारीत होणार्‍या बातम्या व कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने खासगी 200 लोकांची नियुक्ती केली आहे. वास्तविक माध्यमे देशातील स्थितीची शुध्द  व निर्दोष  माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असते. त्यामुळे सरकारला जनतेचे प्रश्‍न सोडवण्यास सहाय्य होते. तसेच लोकांना देखील मिळणार्‍या माहितीनुसार निवडणूक प्रक्रियेत निर्णय घेता येत असतो.

मात्र, माध्यमांवर दबाव आणण्याचे काम सातत्याने होत आहे. खरे तर वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांमधील बातम्या प्रसारित व मुद्रित होण्याअगादेर 4 ते 5 पत्रकारांनी निरीक्षक केलेले असते. त्यामुळे सर्वात विश्‍वासार्ह माध्यम म्हणून त्याकडे पहावे लागेल. देशातील प्रस्थापित माध्यमांची मुस्कटदाबी करून दुसर्‍या बाजूला सरकारला आपल्याला हवा तसा प्रचार करता यावा, यासाठी पर्यायी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. आज पत्रकारिता  क्लृप्त्या काढून चालवली  जात असली तरी पत्रकार मंडळी फेसबुकवर जास्त अ‍ॅक्टीव्ह होताना दिसत असल्याने त्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न  केला जात आहे. सर्वत्र प्रचंड दडपशाही सुरू केली आहे,  असेही डोळे म्हणाले.शितल साठे यांनी प्रास्ताविक केले. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.