Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Satara › मेढा नगरपंचायतीत संगीत खूर्चीच्या खेळाने नागरीक त्रस्त (video)

मेढा नगरपंचायतीत संगीत खूर्चीच्या खेळाने नागरीक त्रस्त (video)

Published On: Aug 29 2018 1:46PM | Last Updated: Aug 29 2018 12:51PMकुडाळ (सातारा) : प्रतिनिधी

मेढा नगरपंचायतीला पुर्ण वेळ देणारा मुख्याधिकारी मिळत नसल्याने नगरसेवकातून, कर्मचारी वर्गातून, नागरीकातून नाराजीचा सुर उमटत आहे. तसेच. मुख्याधिकारी खुर्चीचा संगीत खेळ सुरु राहिल्याने नगरपंचायतीच्या विकास कामांना खिळ बसत असून विविध कामे ठप्प झाली आहेत. यामुळे नागरीकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मेढा हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु काही महिन्यांपासून मेढ़ा नगरपंचायतीचा ठिसूळ कारभार नागरिकांच्या निदर्शनास येवू लागला आहे. मेढा येथे मुख्याधिकारी उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मेढा परिसरात सुमारे चार ते पाच महिने घंटागाडी बंद आहे त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नाबाबत भारतीय जनता पक्षाच्या स्विकृत नगरसेविका डॉ. प्राची कदम यांनी आवाज उठविला असून याचा जाब त्यांनी थेट नगराध्यक्षा, आरोग्य समिती सभापती यांना विचारला आहे . स्वच्छ भारत अभियान सर्वत्र सक्षमपणे राबवले जात आहे परंतु मेढा नगरपंचायतीमध्ये या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मेढा नगरपंचायतीने घंटागाडी दुरुस्तीकामी लावली खरी परंतु पैशांचे आर्थिक राजकारण जुळून न आल्याने ही घंटागाडी धुळ खात उभी आहे.

मेढा परिसरातील स्ट्रिट लाईट ही बंद असल्याने नागरीकांना ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडेही नगरपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. मेढ्यातील अंतर्गत रस्त्यांचा व पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य महिला नगरसेवकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना पक्षातुनच आहेर मिळाल्याने गप्प बसावे लागत आहे परंतु त्यांनाही आपले काम दमदार करावे लागत आहे. नागरीकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले आहे त्याचा विसर त्यांना पडला नाही त्यामुळे कामाचा पाठपुरावा केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा पवित्रा सर्व महिला नगरसेविकांनी घेतला आहे. जावलीच्या तहसिलदार सौ. रोहिणी आखाडे ज्या ठिकाणी राहतात त्या रस्त्यावर चारचाकी, दुचाकीवाहनांची वर्दळ सुरु असल्याने सदर परिसरही संपुर्णपणे चिखलमय झाला असून अधिकाऱ्याची अशी अवस्था तर सामान्य नागरीकांचे काय ?हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सलग पडणारा पाऊस यांमुळे रस्त्यांवर चिखल झाला असून यांवर बुरुम टाकण्याचे कामही नगरपंचायतीकडून झाले नाही त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सुर उमटला आहे. मेढा नगरपंचायतीला प्रभारी मुख्याधिकारी मिळत असल्याने विकासात्मक कार्य करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आलेला निधी परत जात आहे. त्यामुळे  नगरसेवकांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे. 

यापूर्वी देखील पुर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने सलग पाच सभा तहकुब कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे  मेढा नगरपंचायतीचे काही नगरसेवक, नगरसेविका यांनी जिल्हाधिकारीसो यांनाही निवेदन दिले आहे. आताही तसेच होत असून सभा घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत . पुन्हा एकदा " ये रे माझ्या मागल्या "प्रमाणेच नगरपंचायतीला कोण वाली आहे का ? असा सवाल जनतेतून, नगरसेवकांतून विचारला जात आहे. आता मात्र पुन्हा अशी वेळ आली तर नगरपंचायतीला टाळे ठोकणार अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विकास देशपांडे यांनी दिली आहे.