Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Satara › मायणीत दिवसभर तणावपूर्ण वातावरण 

मायणीत दिवसभर तणावपूर्ण वातावरण 

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 10:42PMमायणी  : वार्ताहर

येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव  यांच्या  आत्महत्येनंतर सलग दुसर्‍या दिवशी मायणी येथील तणाव कायम होता. आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या सुरेंद्र गुदगे यांना अटक करावी, या मागणीसाठी  डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीकडून मायणी बंद पुकारण्यात आला.  दरम्यान, सुरेंद्र  गुदगे समर्थकांनीही आज आक्रमक पवित्रा घेत बंदच्या विरोधात मोर्चा काढत गुदगे  यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची  मागणी केली.  त्यामुळे दिवसभर मायणीत तणावपूर्ण शांतता होती. 

येथील केबल व्यवसायिक मोहन बाबुराव जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जाधव कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून गुदगे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावेळी पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांनी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गुदगेंचे नाव चिठ्ठीत असल्याने त्यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई व्हावी, या मागणीसाठी मंगळवारी भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायतीने  मायणी बंदचे आवाहन केले.  
ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार  या बंदला मायणीकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.  मायणीतील बाजारपेठ दिवसभर बंद राहिली. बंदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जलदगती कृती दलाच्या ताफ्यासह पोलीस बंदोबस्त चोख होता. 

दरम्यान,  सुरेंद्र गुदगे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटा व राजकीय द्वेषापोटी केलेला असून त्याविरुद्ध मंगळवारी ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने निषेध करीत शांततेत मोर्चा काढला. या घटनेची सखोल चौकशी यावी व खोटी  फिर्याद मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले. 

सकाळी सव्वा आकराच्या सुमारास बसस्थानकाजवळून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात खोटे गुन्हे मागे घ्या, खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या गेल्या. अनेकांनी काळ्या फिती लावून मोर्चात सहभाग घेतला होता. मोर्चा मायणी दूरक्षेत्रात पोहोचला तेथे डीवायएसपी यशवंत काळे यांना  निवेदन देण्यात आले.

गुदगेंनी जाधव यांना कधीही त्रास दिला नाही दमदाटी केली नाही जाधव हे येळगावकरांचे समर्थक होते व गुदगेंचे विरोधक होते. जाधव यांनी मायणी बँकेतून कर्ज घेतले होते .बँकेने कर्ज वसुलीची सनदशीर मार्गाने कारवाई केली होती. त्यानंतरही मोहन जाधव यांनी कधीही गुदगे विरोधात कसलीच तक्रार केली नाही. याचा विचार करून योग्य तपास करावा.