Thu, Mar 21, 2019 23:28
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › माऊलींच्या सोहळ्याचा आज बरडमध्ये मुक्काम

माऊलींच्या सोहळ्याचा आज बरडमध्ये मुक्काम

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:32PMफलटण : प्रतिनिधी

फलटण येथील मुक्काम आटोपून सोमवार दि. 16 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड, ता. फलटण येथील मुक्कामासाठी येथून मार्गस्थ होणार आहे.  

फलटण तालुक्यातील तरडगाव, फलटण येथील दोन मुक्काम आटोपून सोहळा सोमवारी बरडकडे जात असताना फलटण ते बरड या मार्गावर विडणी, पिंप्रद, वाजेगाव  या ठिकाणी सकाळची न्याहरी, दुपारचा विसावा घेऊन सोहळा बरड येथे पोहोचणार आहे. सोहळ्याच्या स्वागतासाठी बरड ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालखी मार्ग आणि पालखी तळाची पूर्ण स्वच्छता केली असून सोहळा पालखी तळाकडे जात असताना फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. सोहळ्याच्या वाटेत सडा रांगोळ्या  काढून फुलांचा वर्षाव केला जाणार आहे.

माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असल्याने बरडसह परिसरातील गुणवरे, निंबळक, राजुरी, मुंजवडी, नाईकबोमवाडी व परिसरातील भाविक येथील पालखीतळावर माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतील असा अंदाज आहे. सोहळा मंगळवारी सकाळी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी हा सोहळा सातारा जिल्ह्याच्यावतीने सोलापूर जिल्हावासियांकडे सुपूर्द करतील. त्यानंतर सोहळा सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे विसावणार आहे.  दरम्यान,  या सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातून प्रस्थान होत असल्यामुळे पालखी मार्गावरील भाविकांना हुरहूर लागून राहिली आहे.