Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Satara › 30 वर्षांपासूनची सलतेवाडीची पायी दिंडी 

30 वर्षांपासूनची सलतेवाडीची पायी दिंडी 

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 10:28PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण 

पंढरपूर स्थित श्री. समर्थ सद‍्गुरू योगिराज महाराज यांच्या प्रेरणेने आणि श्रीसमर्थ ज्ञानेश्‍वर माऊली (सपकाळवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली 1988 साली श्रीक्षेत्र सलतेवाडी ते पंढरपूर असा सुरू केलेला माऊली पालखी पायदिंडी सोहळ्याने चालू यंदा 31 व्यावर्षात पदार्पण केले असून अल्प भाविकांच्या साक्षीने सुरू असलेला हा पालखी सोहळा प्रतिवर्षी विशाल होत चाललेला आहे.

ढेबेवाडी विभागातल्या श्री. वाल्मिकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या छोटीशी वसाहत असलेल्या सपकाळवाडी  येथील ज्ञानेश्‍वर माऊली भुजबळ, सलतेवाडी या वस्तीतल्या बाबुराव महाराज सलते, नारायण महाराज सलते, दगडोपंत सलते महाराज आणि पांडुरंग महाराज सलते, यांनी हा पायदिंडी सोहळा सुरू केला. याबाबत त्यांनी सांगितले की त्यावेळी पंढरपूर निवासी एक साधु महाराज सर्वत्र भटकंती करीत ढेबेवाडी विभागात आले आहेत असे समजले होते. तेंव्हा त्यांच्या भेटीची इच्छा मनात निर्माण झाली व प्रकर्षाने त्यांना भेटावे, अशी ओढ लागली. एके दिवशी अचानक त्यांचेच सलतेवाडीत आगमन झाले, तेच योगिराज हरिहर महाराज होत. त्याकाळी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आषाढी,कार्तिकी वारीला आम्ही जात असू. मात्र योगिराज महाराजांच्या सहवासामुळे प्रेरणा मिळून त्यातूनच मग वाहनाने नव्हे तर श्रीज्ञानेश्‍वर माऊली श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पायदिंडी पालखी सोहळ्याप्रमाणेच आपणही पायदिंडी पालखी सोहोळा काढण्याची प्रेरणा मिळाली.1988 साली आम्ही प्रथम पायदिंडी सुरू केली. त्यावेळी आम्ही विठ्ठल भाविक भक्त होतो फक्त पांच. सुरूवातीला घरातून निघतांना बरोबर घेतलेले जेवण एवढीच शिदोरी आमच्या बरोबर होती, जिथे रात्र पडेल, तिथे मुक्काम करायचा मात्र उपाशीपोटी झोपायचे नाही, ज्या गावात मुक्काम करायचा तिथे मधुकरी मागायची, असे ठरविले. त्याप्रमाणे मधुकरी मागून रात्र आणि दुसरा दिवस काढीत होतो, कधीही कुठे कुणी नाही म्हटले नाही. दुसर्‍यावर्षी पायदिंडी सोहोळा निघाला तेंव्हा आम्ही पाच वरून दहावर पोहोचलो होतो. 

पहिल्या वर्षाप्रमाणेच याहीवर्षी पोटापाण्याचा प्रश्‍न मिटवायचे ठरवूनच आमची वाटचाल सुरू होती. मात्र यावेळी भलताच अनुभव मिळाला व कांही ग्रामस्थ आमच्या या छोटेखानी पाय दिंडी सोहोळ्याला आडवे येऊन आम्हाला गावात घेऊन जाऊ लागले व आमचा फलाहार, वा अल्पोपहार देऊन यथोचित सन्मान करू लागले तर मुक्कामाला थांबायचे त्या गावात माधुकरी मागायची वेळच आली नाही. तिथल्या ग्रामस्थांनी आमच्या जेवण व निवासाची सोय केली होती व यापुढे प्रतिवर्षी ज्या तिथीला आमचा पायदिंडी सोहोळा मुक्कामी राहिला तो दिवस आमची पालखी मुक्कामाला येण्याचा दिवस नक्की केला. प्रतिवर्षी त्या त्या गावातले ग्रामस्थ आमचा पायदिंडी सोहळा गावात येण्याची वाट पहात असतात.

पायदिंडी सोहळ्यात  पुणे, मुंबई, व अन्य गावाकडून असे मिळून आजमितीला 125 हून जास्त भाविक दाखल होतात. दररोज मुक्कामी प्रवचन, किर्तन, भजन, हरिपाठ असे नित्यक्रम चालतात, अशी माहिती नारायण महाराज सलते, लक्ष्मण ठोंबरे, बाबुराव महाराज, पांडुरंग महाराज या भाविकांनी दिली.