Sun, Jun 16, 2019 12:52
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › दिग्गजांची साथ अन् त्यांचे योगदान

दिग्गजांची साथ अन् त्यांचे योगदान

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 10:02PM

बुकमार्क करा

कराड : चंद्रजित पाटील

स्व. ज्ञानदेव जाधव, स्व. पी. डी. पाटील यांच्यासह दिग्गजांनी स्वीकारलेले पालकत्व आणि स्व. जयवंतराव जाधव यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांची साथ यामुळे लिबर्टीच्या नावलौकिकात भरच पडली. आकाराम पाटील यांनी हॉलिबॉलमध्ये तर मौला पठाण यांनी कबड्डीमध्ये देशपातळीवर कराडचे प्रतिनिधीत्व केले. त्यामुळेच पठाण कुटुंबीय, जयवंतराव जाधव, रामभाऊ रेपाळ यांच्याशिवाय लिबर्टी, कराडच्या कबड्डीचा इतिहासाच पूर्ण होऊ शकत नाही.

लिबर्टीच्या खेळाडूंना अत्याधुनिक व्यायामशाळेची गरज लक्षात घेत  स्व. पी. डी. पाटील यांनी आरसीसी इमारतीसाठी आमदार फंडातून निधी दिला. ज्ञानदेव जाधव हे ख्यातनाम व्हॉलीबाँल खेळाडू होते. स्वातंत्र्यसैनिक असलेले जाधव गोरगरिब खेळाडूंना मदत करण्यासाठी कराडातच नव्हे, तर जिल्हात ज्ञानबा जाधव म्हणून ओळखले जात. त्यांच्या या योगदानामुळे कराडसह परिसरातील अनेक खेळाडूंना न्याय मिळाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जयवंतराव जाधव यांनी लिबर्टीला मोठा आर्थिक आधार दिला होता. कबड्डीत चढाईवेळी खेळाडूंना बाद करण्यासाठी जयवंतराव जाधव मारत असलेली उडी पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची मोठी गर्दी होत होती. याच उडीसह जाधव यांनी लिबर्टीच्या सहकार्‍यांसमवेत जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. लिबर्टीचे संस्थापक रामभाऊ रेपाळ यांची व्हाँलीबाँलसह कबड्डीवर श्रद्धा होती. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता जिद्दीने संघर्ष करण्यासाठी त्यांची ख्याती होती.

तर मौला पठाण यांच्यासह त्यांचे चिरंजीव फिरोज पठाण यांनी राज्यस्तरावर लिबर्टीचे प्रतिनिधित्व केले. पठाण कुटुंबियांचे कबड्डीतील योगदान आदर्शवत असेच होते. अलिकडच्या काळात साईराज भोसले, इंद्रजीत पाटील, विशाल शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी हीच कराडच्या लिबर्टी मजदूर मंडळाची गौरवशाली परंपरा आजही पुढे नेताना दिसतात. त्यामुळेच लिबर्टी मजदूर मंडळाला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे.