Wed, Feb 20, 2019 17:00होमपेज › Satara › मसूर विभागाची आरोग्य सेवा ‘अपंग’

मसूर विभागाची आरोग्य सेवा ‘अपंग’

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:41PMमसूर ; दिलीप माने

मसूरसारख्या निमशहरी भागात ग्रामीण रुग्णालय व्हावे ही मागणी अनेक वर्षे धुळखात पडल्याने मसूर  विभागातील 35 गावांना आरोग्य केंद्रांच्या तोकड्या सोयींवरच समाधान मानावे लागत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचाही येथे आभाव आहे. गत 12 वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. मसूरला नगरपंचायतीचा दर्जा मिळेल एवढी लोकसंख्या आहे. आसपासच्या खेड्यातील लोक मसूर हे मध्यवर्ती ठिकाण समजून व्यवसायानिमित्त येथे येतात. त्यामध्ये जम बसला की इथेच मुलांच्या शिक्षण व नोकरीनिमित्त वास्तव्य करतात. त्यामुळे मसूरची लोकसंख्या तालुक्याच्या क्षमतेयेवढी  आहे. 

मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा मर्यादीत मिळत आहे. अपुरी तीही अद्यावत यंत्रणा नाही. याचा विचार करता मसूरला ग्रामीण रुग्णालयाची मागणी आहे. परंतु प्रस्ताव पाठवूनही तो मंत्रालयात रेंगाळल पडला आहे. मसूरला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत किवळ, निगडी, शामगाव, शिरवडे, कोपर्डे हवेली, वडोली निळेश्‍वर व कोणेगाव अशी सात उपकेंद्रे आहेत. कार्यक्षेत्रातील रुग्ण आरोग्य केंद्रात येऊन आरोग्य सेवेचा लाभ घेतात. मसूरला अद्यावत सुसज्ज आरोग्य केंद्राची इमारत आहे. आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र ही यंत्रणा तोकडी पडत आहे. मसूरसारख्या निमशहरी भागासाठी ग्रामीण रुग्णालयाची नितांत गरज आहे. 

ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव 2005 साली मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक असलेला एक लाख लोकसंख्येचा निकष हा पुसेसावळी, वाठार किरोली, वडोली भिकेश्‍वर, कोपर्डे हवेली पासूनच्या अलिकडच्या भागातील गावांची लोकसंख्या निश्‍चित करून  रुग्णालयाचा प्रस्ताव पाठविला गेला आहे. मात्र तो निकषानुसार गेला नसल्याचे समजतेे. प्राथमिक आरोग्य केंद्रावरचा कामकाजाचा मोठा व्याप  पाहता ग्रामीण रुग्णालयाची मसूर विभागाला गरज आहे. बाल व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचा स्वतंत्र विभाग, एक्स-रे मशीनची सुविधा,  शवविच्छेदनासाठी शवागृह आदी सुविधा उपलब्ध नाहीत.  त्यामुळे रुग्णांना कराडला उपजिल्हा रुग्णालयात अथवा खासगी  रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न केव्हा मार्गी लागणार याकडे सामान्य जनतेच्या नजरा लागून आहेत.