होमपेज › Satara › सातारा : अक्षय कुमारच्या 'केसरी'चा सेट जळून खाक(Video)

सातारा : अक्षय कुमारच्या 'केसरी'चा सेट जळून खाक(Video)

Published On: Apr 24 2018 8:45PM | Last Updated: Apr 24 2018 8:46PMपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर

अक्षयकुमार प्रमुख नायक असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाच्या भव्य सेटला मंगळवारी दुपारी आग लागली. यामध्ये पूर्ण सेट जळून खाक झाला आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. चित्रपटातील कथेनुसार बॉम्बस्फोट घडल्याचे दृष्य चित्रीत करताना हा प्रसंग ओढवला गेला.  कोरेगाव तालुक्यातील भावेनगर येथून 5 किलोमीटर अंतरावर शूटिंग सुरू आहे.

केसरी या चित्रपटाचे गेल्या चार महिन्यांपासून शुटींग सुरू आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे चित्रपटाचे शुटींग सुरू होते. चित्रपटामध्ये बॉम्बस्फोटाचे एक दृश्य आहे. याचे चित्रीकरण सुरू होते. नियोजनाप्रमाणे बॉम्बस्फोट झाल्यानंतर निम्मा सेट उडवून द्यायचा होता. 

आजच्या दिवसाचे शुटींग सुरू झाले त्यामध्ये चित्रपटातील कथेनुसार बॉम्बस्फोट घडवला गेला. मात्र, कडक उन आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे ही आग भडकली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. अचानक अशी परिस्थिती उद्भवल्याने सेटवर असणार्‍यांची घाबरगुंडी उडाली. आग मोठी लागल्याने कलाकार व सहकारी मंडळींची एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिल्यांनतर तत्काळ सातारा व भुईंज येथून अग्निशामकच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीमध्ये चित्रपटाचा पूर्ण सेट जळून खाक झाला असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.