Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Satara › विनाशकारी  महाभूकंपाची ५० वर्षे 

विनाशकारी  महाभूकंपाची ५० वर्षे 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 8:45PM

बुकमार्क करा

संकलन : गणेशचंद्र पिसाळ, पाटण

शेकडो निष्पापांचा बळी घेवून हजारो नव्हे तर लाखो कुटुंबांच्या संसारांची राखरांगोळी करणारा विनाशकारी महाभूकंप 11 डिसेंबर 1967 साली झाला. या भूकंपाला आज 50 वर्षे पूर्ण झाली. उषःकाल होता होता काळरात्र झाली याचप्रमाणे कोयना व सर्वच उध्वस्त झाले, बेचिराख झाले, होत्याचे क्षणार्धात नव्हते झाले. त्या काळ्या आठवणी आजही तितक्याच तीव्रतेने जाणवतात. त्यानंतर मात्र खरोखरच याच भूकंपग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने मशाली पेटल्या का? याचे मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही, हीच खरी मोठी शोकांतिका...

‘मेणबत्त्या पेटवून मृत भूकंपग्रस्तांना श्रध्दांजली वाहिली, त्या पेटविण्यापूरतीच आता आमची कर्तव्य राहीली’ या चारोळ्यांप्रमाणचं इथल्या भूकंपपिडीत जनतेच जीणं. 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4.21 वाजता हा विनाशकारी 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गाढ साखरझोपेत असणार्‍या अबालवृधांसह सर्वांवरच काळाने हा हल्ला केला. डोळे उघडण्याची संधीही शेकडोंच्या नशिबी आली नाही. हजारो अपंग झाले तर लाखो बेघर झाले.

सूर्योदयानंतर डोळ्यासमोर आपल्याच माणसांच्या मृतदेहांचे ढिगच्या ढिग आणि काडी काडी गोळा करून उभा केलेला संसार पत्त्यांच्या इमारतीसारखा कोसळला होता. याच ढिगार्‍यातून आधी कोणाला बाहेर काढू  ? कोण जगलयं आणि कोण मेलयं ? याचा ताळेबंद कसा लावू ? याच ढिगार्‍यात मला जन्म देणारी आईही आहे आणि ज्यानं स्वतः जगण्यापेक्षा मला जगविण्यासाठी आयुष्य वेचले तो बापही. जिला सात फेर्‍यांच्या साक्षीने घरी आणलं आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं ती बायकोही आहे आणि ज्यांच्या डोळ्यात उद्याच भविष्य पाहिलं होत ती लेकरंपणं याच ढिगार्‍याखाली होती.

कोणाच्या अखेरच्या घटका संपल्या होत्या तर जीवाच्या आकांताने कोणाचीतरी जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी अखेरची केविलवाणी धडपड सुरू होती. हंबरडा फोडावा ,कोणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेवावं असं कोणीच जवळ नव्हतंं. आता उजाडलं होतं समोर डोळे दिपवणारा लख्ख प्रकाशही होता मात्र काळांन घातलेली अंधारी काय केल्या डोळ्यासमोरून जात नव्हती. यातून मग आपल्या रक्तामासांची जीव गेलेली शरीरं बाहेर काढल्याशिवाय पर्यायच नव्हता. आजकाल जेसीबी, पोकलँड सारखी अत्याधुनिक मशिनरी भावनाशून्य असे ढिगारे माळीणसारख्या दुर्घटनेत उपसताना पाहिली.

मात्र त्यावेळी अशी मशिनरी नव्हती त्यामुळे आपलाच उध्वस्त संसाराचा ढिग उपसताना त्यातूनच हे मृतदेह बाहेर काढताना कोणीतरी जिवंत असेल असा खोटा मात्र तितकाच आशावाद ठेवणारा ‘यंत्र’ माणूस त्याची केवळ अधिकृतरीत्या जिवंत असण्याची ती कर्तव्यभावना आजही अंगावर काटा व डोळ्यात पाणी आणल्याशिवाय शांत बसत नाहीत.   या भूकंपात सगळं काही संपल होत. ’ पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कोणी रडणारचं नसेल तर मरणंसुध्दा व्यर्थ आहे ’. अशीच अनेकांची अवस्था झाली होती. त्यानंतर याबाबत तत्काळ तात्पुरत्या उपाययोजना झाल्या. मात्र आज पन्नास वर्षे पूर्ण होवूनही किमान जगण्याचा व त्यासाठी लागणार्‍या नागरी सुविधा पुरविण्यात शासन सपशेल अपयशी ठरले आहे.

पुनर्वसन, भूकंपग्रस्तांना नोकरी अथवा शिक्षणासाठी लागणारे दाखले व नोकर्‍या आदिबाबत आजवर या पिडीतांना किंवा त्यांच्या पिढ्यांनाही न्याय मिळाला नाही. आता या पन्नास वर्षेपुर्तीनिमित्त शासनाला यांच्या मागण्यांसाठी जाग यावी म्हणून येथे आज मेणबत्त्या पेटवून कँडल मार्च काढून भूकंपात जीव गमावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. एक सोपस्कार म्हणून हे ठिक असले तरी जर पन्नास वर्षे अनेक अंदोलने करूनही संबंधितांना न्याय मिळत नसेल तर मग ’ तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर मग तोंडात वाजवून न्याय मिळवा ’. याप्रमाणेच न्याय मिळवावा लागणार आहे. मेणबत्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने राज्यकर्त्यांच्या डोक्यात म्हणावासा प्रकाश पडणार नसेल तर मग येथे अंदोलनाच्या मशाली पेटविल्याशिवाय न्यायच मिळणार नाही आणि तीच खरी या भूकंपात निष्पाप जीव गेलेल्या भूकंपग्रस्तांना श्रध्दांजली ठरेल.

भूकंप 'ग्रस्त'

1967 च्या भूकंपबळींना ,
आता म्हणे  50 वर्षे झाली .
म्हणूनच का सगळ्यांना पुन्हा ,
त्यांची आठवणं झाली?
तुमच्याच वीज, पाण्यासाठी ,
त्यानींच जमिनी दिल्या होत्या. 
जमिनीच न्हवे तर भूकंपात ,
त्यांच्याच पिढ्या गाडल्या होत्या.
जमिनीपेक्षाही खोल भेगा, 
यांच्या नशिबालाच पडल्यात. 
पुनर्वसन, दाखले, नोकर्‍या, 
लालफितीतच दडल्यात.
नकोत आता घोषणा, 
आणि तीच ती आश्‍वासनं. 
मेणबत्त्या पेटवून कधी ,
जागं होत का हो शासनं  ?
भिक नको न्यायासाठी, 
आता तरी ’मशाली’ पेटवा. 
श्रध्दांजली म्हणून का होईना यांचे ,
कायमचे ’ दारिद्र्य ’ मिटवा.     - गणेशचंद्र पिसाळ, पाटण.

आधुनिक प्रयोगशाळाच भूकंपात नष्ट झाली तर..?

कोयना विभागात सातत्याने छोटे, मोठे भूकंप होतात. मोठ्या भूकंपात धरणात निर्माण होणारे प्रवेग मोजण्यासाठी धरणाच्या पोटात तीन ठिकाणी प्रवेग मापन बसविले आहेत. त्याचबरोबर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल मध्ये मोजण्यासाठी प्रकल्प आणि आसपासच्या परिसरात म्हणजेच कोल्हापूर, कराड, सातारा, कोयना, अलोरे चिपळूण आणि रत्नागिरी याठिकाणी भूकंप मापन यंत्रे बसविण्यात आली आहेत. 

मात्र, यावर काम करणारा कर्मचारी वर्ग हा अर्धशिक्षीत व अर्धपगारी होता. भूकंप झाल्यानंतर त्याची तीव्रता व धरणाची सुरक्षितता याबाबत वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती घेण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी जातो. याच पाश्वभूमीवर येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा व्हावी ही अनेक वर्षांपासून मागणी होती. याबाबत विधिमंडळात देखील अनेकदा प्रश्‍न निर्माण झाले. 

काही वर्षांपूर्वी याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावर प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी संबंधित राज्यमंत्र्यांना तत्कालीन अधिकार्‍यांनी याबाबतीत माहिती देताना येथे आधुनिक प्रयोगशाळा नाही, त्यासाठी प्रशिक्षीत नोकरवर्ग नाही, भूकंप झाला की वेगवेगळ्या पाच ते सहा ठिकाणाहून माहिती घेवून ती एकत्रित करून त्याचा अहवाल सादर केला जातो आणि त्यासाठी एवढा कालावधी जातो असे सांगण्यात आले.

याबाबत विधिमंडळात प्रश्‍नोत्तराच्यावेळी विरोधकांनी संबंधित राज्यमंत्र्यांना धारेवर धरले मात्र त्यांनी त्यावेळी आपल्या उत्तरात कोयना येथे अद्यावत भूकंपमापन प्रयोगशाळा बांधली आणि मोठ्या भूकंपात तीच नष्ट झाली तर निरुपयोगी ठरेल त्यामुळे धरणस्थळी अशी अत्याधुनिक प्रयोगशाळा नको ती इतरत्रच असावी असे सांगितले आणि आश्‍चर्य म्हणजे  ते सर्वांना मान्यही झाले. त्यानंतर मात्र कोयनेत भूकंपमापन अत्याधुनिक प्रयोगशाळा हे आजवर स्वप्नच राहिले आहे.  ते स्वप्न पूर्ण झाले नाही. अशा गंमतीजमतीच्या आठवणीही काही निवृत्त अधिकार्‍यांनी यानिमित्ताने बोलून दाखविल्या. 

कोयनेने पचविले 1, 20,320 भूकंप

1963 पासून आत्तापर्यंत कोयनेने 1, 20,320 भूकंप पचविले आहेत. यामध्ये ....

2 ते 3 रिश्टर स्केल : 1 लाख 18 हजार 568 भुकंप. 
3 ते 4  रिश्टर स्केल : 1647 भूकंप. 
4 ते 5 रिश्टर स्केल : 96 भूकंप. 
5 ते 7 रिश्टर स्केल : 9  भूकंप.

एकूण भूकंप  1 लाख 20 हजार 320 

यामध्ये जाणवलेल्या भूकंपांची संख्या 1574 इतकी आहे. 

चालूवर्षी आत्तापर्यंत झालेले भूकंप 

2 ते 3 रिश्टर स्केल : 324  भूकंप 
3 ते 4 रिश्टर स्केल :  5   भूकंप
4 ते 5 रिश्टर स्केल : 2   भूकंप

एकूण भूकंप  331  
जाणवलेले भूकंप  6 

कोयनेच्या बकाल अवस्थेला नक्की जबाबदार कोण?

कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प यासह नैसर्गिक साधन संपत्तीचा खजीना असणारा हा परिसर. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या काळात हे धरण झाले. 11 डिसेंबर 1967 च्या भूकंपात येथे कमालीची जीवीत व वित्त हानी झाली तो भूकंप झाला नसता तर याच कोयनेला राष्ट्रीय पर्यटन केंद्रासारखे दिवस आले असते. या भूकंपात सर्वस्व गमाहूनही पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे कोयनेने भरारी घेतली.

दरम्यानच्या काळात माजी बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नाने पुन्हा अच्छे दिन आले. याकाळात धरणाला अन्य पूरक प्रकल्प व पर्यटनासाठी नेहरू उद्यान, पॅगोडा, जलाशयात बोटींग आदीमुळे कोयना विकसित होवू लागली. स्थानिकांना रोजगार, व्यवसाय मिळताना बाहेरच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या कामांसह महत्वपूर्ण शासकीय कार्यालये यामुळे सर्वकाही गुण्या गोविंदाने चालू होते.

मात्र गेल्या काही वर्षांत याला दृष्ट लागली आणि येथे नवा कोणताही प्रकल्प आला नाही. जुनी कामे संपल्याने कंपन्या निघून गेल्या. महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालये येथून हलविण्यात आली. पर्यटनाला विरोध झाला धरण सुरक्षेचा बागुलबुवा करून बोटींग, लाँच बंद केल्या. परिणामी स्थानिक रोजगार, व्यवसाय देशोधडीला लागला. बाजारपेठा ओस पडल्या. अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह यातील कडक कायदे, जाचक अटी व निर्बंध यामुळे स्थानिक मेटाकुटीला आले आणि मग सरतेशेवटी कोयनेला बकाल रूप आले.

याला नक्की जबाबदार कोण? याबाबत आता नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेच नव्हे तर स्थानिकांनीही आत्मचिंतन व आत्मपरीक्षण केले तर योग्य उत्तर मिळेल. आणि यावर संघटिततपणेे आवाज उठविला तर पुन्हा कोयनेला सोन्याचे नक्कीच दिवस येतील यात शंकाच नाही. यासाठी गरज आहे, प्रबळ इच्छाशक्‍तीची. याद्वारेच आता  नवसंकल्पना जागृत झाली.त्यासाठी निकराचे प्रयत्न झाले तर कोयनेची ही बकाल अवस्था संपून पुन्हा बहार येईल.