Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Satara › मसालेदार ‘आले’ आले फार्मात..!

मसालेदार ‘आले’ आले फार्मात..!

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 9:19PMसातारा : सुनील क्षीरसागर

पश्‍चिम महाराष्ट्रात साखरेच्या दराने साखर कारखाने अडचणीत आले असतानाच याच साखरपट्ट्यातील मसालेदार ‘आले’ मात्र फार्मात आले आहे. गेली तीन वर्षे दराअभावी मातीमोल झालेल्या आल्याच्या दराने उसळी घेवून 30 हजाराकडे मजल मारली आहे.  गुरूवारी आल्याचा दर 27 हजार रुपये असा होता. 

साखरेच्या पट्ट्यात ऊसापाठोपाठ आल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आल्याला दर आला तर सोन्याहून पिवळे. मात्र, दर पडला तर शेतकर्‍याला मातीतही घालवते, असे बोलले जाते. आल्याचे पीक घेणे म्हणजे जुगार खेळल्यासारखेच असते. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये आल्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.  त्यासाठी एकरी खर्चामध्येही वाढ झाली असून वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळी औषधे मारायला लागत असल्याने आल्याचा उत्पादन खर्चही अलिकडच्या काळात वाढला आहे. नवीन तंत्रज्ञानाने तुषार किंवा ठिबक सिंचन वापरुन हजारो क्‍विंटल उत्पन्‍न आले उत्पादक शेतकरी घेत असतात. 

गेली 3 वर्षे ऊस पिकाने शेतकर्‍यांना बागायती पट्ट्यात थोडासा हात दिला. मात्र, आल्याच्या दराने अक्षरश: त्याला मागे खेचण्याचे काम केले आहे. 7 ते 8 हजार रुपये गाडी असा दर किंवा त्यापेक्षाही खाली आले पिकाच्या दराची घसरण झाल्याने अक्षरश: सोन्यासारखे आलेले हे पीक मातीमोल ठरले. अनेकांनी आल्याचे पीक घेणेच बंद केले आहे.गेल्या काही दिवसांपासून  आल्याच्या दरात वेगाने वाढ होत असल्याने आले उत्पादक शेतकरी हर्षोल्हासित झाला असून 7 ते 8 हजार रुपये गाडी असा दर असलेले आले आता 30 ते 32 हजार रुपयांवर गेले आहे. याचवर्षी साखरेच्या दराने पलटी मारल्याने साखर कारखाने पर्यायाने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अद्यापही जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी ऊस हंगाम संपूनही शेतकर्‍यांना उसाचे पहिले बील अदा केले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गोत्यात आला आहे.

अतीत, नागठाणेेत आल्याची बाजारपेठ

सातारा जिल्ह्यात नागठाणे, सासपडे, अतीत, काशीळचा पट्टा आल्याची बाजारपेठ म्हणूनही ओळखला जातो. याच क्षेत्रामध्ये आल्याची लागणही मोठ्या प्रमाणावर  केली जाते. अलिकडे सातारा जिल्ह्यात कोरेगाव, सातारा, कराड आदी तालुक्यांतील असंख्य गावांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आल्याचे पीक घेतले जात आहे. 

Tags : Satara, Masala, farming,  fast