Mon, Jun 17, 2019 14:55होमपेज › Satara › लग्नसराई हंगाम शेवटच्या टप्प्यात

लग्नसराई हंगाम शेवटच्या टप्प्यात

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 7:53PMसातारा : प्रतिनिधी

यंदाचा लग्‍नाच्या धामधुमीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अधिक मासामुळे सध्या लग्‍नतिथींना ब्रेक लागला असला तरी जून-जुलैमधील काही मोजक्याच तिथी शिल्‍लक आहेत. उरलेल्या लग्‍न तिथीमध्ये ‘आपलंही वाजावं’ यासाठी संबंधित कुटुंबियांची तारांबळ उडत  आहे. 

यंदाचा लग्‍नसराई हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे.  अधिक मासामुळे विवाह इच्छुकांना किमान महिनाभर वाट पहावी लागत आहे. तसेच जून व जुलै महिन्यांत असणार्‍या लग्‍नतिथीत पाऊस पडल्यास लग्‍न सोहळ्याच्या कार्यात व्यत्यय येण्याच्या शक्यतेने नोव्हेंबरनंतरचा मुहूर्त शोधण्याकडेही अनेक वधू-वरांच्या पालकांचा कल दिसून येत आहे. यंदा लग्‍नाची धामधूम  जोरात सुरू राहिली. एका मागून एक लग्‍नतिथी लागून आल्याने वधूवरांच्या पित्यांना मंगल कार्यालयापासून ते आचारी, बँन्ड, घोडा यांची जुळवाजुळव करताना मोठी त्रेधातिरपीट करावी लागली. लग्‍नतिथी  लागून आल्याने  ही साधने उपलब्ध करण्यासाठी  वाटेल ती किंमत मोजावी लागत आहे. ही परिस्थिती जून महिन्यात हाताच्या बोटावर लग्‍नतिथी शिल्‍लक राहिल्याने निर्माण होणार आहे. 

या वर्षीच्या उत्तरार्धातील लग्‍नसराईत काही मोजक्याच तिथी शिल्‍लक राहिल्या आहेत. अधिक मासामुळे सध्या विवाह इच्छुकांची कोंडी झाली आहे. या महिन्यात विवाह तिथी नसल्यामुळे त्यांना काहीच हालचाली करता येत नाहीत. मात्र, पुढील महिन्यात असणार्‍या काही मोजक्या तिथींमध्ये बार उडवून देण्याचाही अनेकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुले-मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. पसंतीचा भाग झाल्यानंतर पत्रिका जुळल्यास विवाह उरकण्यावरही काहींनी भर दिला आहे. त्याद‍ृष्टीने त्यांच्या हालचाली मात्र सुरूच आहेत.