Tue, Jun 02, 2020 01:48
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › खंडोबा - म्हाळसा शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

खंडोबा - म्हाळसा शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:16PM

बुकमार्क करा
उंब्रज : सुरेश सूर्यवंशी

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा उद्या सायंकाळी गोरज मुर्हूतावर होत आहे. विवाह सोहळयासाठी पाल नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. तर रात्री उशिरा वर्‍हाडी मंडळींचे पाल नगरीत आगमन होवू लागले आहे.  

गेल्या काही वर्षापासून पाल यात्रेत जिल्हा प्रशासनाने अनेक नाविन्यपूर्ण बदल घडवून आणले आहेत. त्यांना देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी आणि भाविकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने यात्रा शांततेत पार पडत आहे. 

रविवार दि. 31 डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, श्री खंडोबा व म्हाळसा यांचा गोरज मुर्हूतावर होणारा विवाह सोहळा हे यात्रेचे मुख्य वैशिष्टय आहे. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक उपस्थित राहतात.

शुक्रवार दुपारपासूनच लग्नसोहळयासाठी वर्‍हाडी मंडळींचे आगमन पाल नगरीत होवू लागले आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने या सर्व वर्‍हाडी मंडळींचे स्वागत करण्यात येत आहे. काही मानकरी पाल नगरीत दाखल झाले आहेत तर काहींचे सायंकाळी आगमन होणार आहे. सकाळ पासूनच पाल नगरी भाविकांनी फुलू लागली आहे.

जिल्हा प्रशासनाने यात्रा शांततेत पार पडण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली आहे. ठिकठिकाणी मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. तर यात्रेच्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी यांनी भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.                

यात्रेसाठी मोठा पोलिस फौज फाटा तैनात

जिल्हा प्रशासनाने पाल यात्रा शांततेत पार पाडण्याठी पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अति.पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक,  पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, महिला पोलिस, वाहतुक पोलिस, शीघ्र कृती दलाचे जवान, ट्रायकन फोर्स, होमगार्ड आदींचा फौजफाटा तैनात केला आहे. संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.