Tue, Apr 23, 2019 20:12होमपेज › Satara › मंडईत समस्यांचाच बाजार

मंडईत समस्यांचाच बाजार

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 8:45PMसातारा : विशाल गुजर 

सातारा शहरातील प्रमुख भाजी मंडईंसह ठिकठिकाणच्या व उपनगरातीलही भाजी मंडई अडचणींच्या फेर्‍यात अडकल्या असून सर्वत्रच समस्यांचा बाजार भरत आहे. या कोंडाळ्यात सापडलेल्या ग्राहक व विक्रेत्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. पावसाळ्यात तर या समस्यांची दलदल होत असून या सर्वांमधून वाटचाल करताना जिकिरीचे होऊन बसले आहे. शेतकरीराजा भरडला जात असून ग्राहकही वैतागून गेला आहे. ‘मंडई नको रे बाबा’ अशी अवस्था झाली असली तरी मंडईशिवाय गत्यंतर नसल्यामुळे अडचणीतूनही मार्गक्रमण सुरुच असल्याचे चित्र आहे.

सातार्‍यातील मंडईंना अनेक ठिकाणी अवकळा आल्यासारखे चित्र आहे. बसस्थानकासमोरील बाजार समितीच्या समोर सकाळच्यावेळी भरणारी मंडई वाहतूक समस्येच्या विळख्यात अडकली आहे. पावसाच्या धारात चिंब होणारा शेतकरी चिखलात मिळेल त्या जागी आणलेला माल विकून कसाबसा तग धरुन आहे.  तीच अवस्था राजवाडा येथे बांधण्यात आलेल्या टोलेजंग छ. प्रतापसिंह भाजी मंडईमध्ये असून तळात पार्किंगच्या जागेवर घाणेघाण झाली असून तळीरामांनी उच्छाद मांडला आहे. तर वरच्या मजल्यावर मंडई सुरु असून त्यावरील मजल्यावर फळविक्रेते बसत नसल्याने या इमारतीला भूतबंगल्याचे स्वरूप आले आहे. जुना मोटर स्टँड येथे म. फुले भाजी मंडई दोन ठिकाणी रविवार आणि गुरुवार असे दोन दिवस भरत असून व्यापार्‍यांनी सगळ्या जागा बळकावल्यामुळे पालिकेची पावती फाडूनही विनासुविधा शेतकरी मिळेल त्या जागेवर बसून भाजीपाला विकतो. आमदनी नसल्याने अनेकदा व्यापार्‍याला मिळेल त्या दराने माल विकून परतीचा प्रवास करण्यात धन्यता मानावी लागते. तर रविवार पेठेतील मंडई चिखलात बसत आहे. पालिकेची पावती द्यावी, इतकी कमाईही होत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पहायला मिळते.

पार्किंग की दारूअड्डा

राजवाड्याजवळील भाजी मंडईच्या खाली असलेले पार्किंगलगत दारूचा अड्डा बनला आहे. अनेक ग्राहक रस्त्याबाजूला वाहने पार्क करून मंडईत जातात. या पार्किंगमध्ये दारू पिणे, सिगारेटचे धुराडे, गांजा ओढणे असे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा दारु अड्डा बंद होणार आहे की नाही? असा सवालही ग्राहक व विक्रेत्यांनीही केला आहे.

हिरव्यागार भाज्यांची भुरळ

राजवाड्या पाठीमागील असलेली छत्रपती प्रतापसिंह भोसले मंडई मॉडर्न मंडई म्हणून ओळखली जाते. अलिकडे या मंडईत सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. येथे लाईटच्या सुविधाही आहेत. त्यामुळे टोपलीत असलेली हिरवीगार भाजी ग्राहकांना भुरळ पाडते. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची हाऊसफुल्ल गर्दी असते.

फळविक्रेते रस्त्यावरच

राजवाड्यामागील मंडईत असलेला वरचा मजला फळविक्रेत्यां-साठी बांधण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी ग्राहक फिरकणार नाही, याचा विचार करून विक्रेत्यांनी रस्त्याकडेला आपले ठाण मांडले आहे. त्यामुळे वरील मजला धूळखात पडला आहे.

भिंत पडण्याचा धोका

रविवार पेठेतील मंडई नेहमीच गजबजलेली असल्याने अनेक विक्रेत्यांना बाहेर बसावे लागते. बाहेरील बाजूस असलेल्या भिंती धोकादायक झाल्या असल्याने कधीही मोठा अनर्थ घडू शकतो. शेतकरी आणि विक्रेते पालिकेला कर देत असले तरी सुविधा मिळत नसल्याचे वास्तव भयानक आहे.

सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

रविवार पेठेतील छत्रपती शाहू मंडईच्या उजव्या बाजूला फक्त छतासह  बसण्याची थोडी फार सोय आहे. त्यात पावसाची मोठी सर आली की डायरेक्ट पाणी मंडईत येते. याच मंडईत काही विक्रेते छत टाकून थोडीफार बसण्याची सोय करतात. मात्र, त्यांना नेहमीच ऊन-पावसाचा सामना करावा लागत असतो. मोठा पाऊस आला तर या मंडईत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे या दलदलीतून वाट काढताना विक्रेते व ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महात्मा फुले भाजीमंडई ओस

बुधवार पेठेतील महात्मा फुले भाजी मंडई ही केवळ दोनच दिवस हाऊसफुल्ल भरते. गुरुवार व रविवार सोडला तर या ठिकाणी ग्राहक व विक्रेते हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच दिसून येतात. या भाजी मंडईत सुविधांची वानवा मोठ्या प्रमाणात दिसून येते. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या नळातून अस्वच्छ पाणी मिळत असून त्यावर झुडपांनी अतिक्रमण केल्यामुळे नवीन विक्रेत्याला हा नळ शोधावा लागत आहे.

मंडईबाहेर भाजीपाल्याचा ढीग

शहरातील प्रमुख म्हणून छत्रपती शाहू मंडई, छत्रपती प्रतापसिंह भोसले मंडई व महात्मा फुले मंडई ओळखल्या जातात. यासह ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या मंडई आहेत. येथे विक्रीस आलेले विक्रेते सकाळी किंवा सायंकाळी उरलेला माल, भाजीपाला मंडईतच किंवा बाहेर टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण होऊ लागला आहे.

 फक्त शेतकर्‍यांनीच माल विकावा

बाजार समितीच्या आवारात व्यापार्‍यांनी मालाची विक्री करू नये, फक्त शेतकर्‍यांनीच माल विक्री करावा, अन्यथा व्यापारी आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा भलामोठा फलक लावला असला तरी त्याच फलकाच्या काही अंतरावर चक्क व्यापारीच माल विकतात हे वास्तव आहे .

 फिरत्या मंडईत होऊ लागली वाढ

सध्याच्या डिजीटल जमान्यांबरोबर काही भाजी विक्रेते स्वतःच्या वाहनातून चालता-बोलता भाजी व्यवसाय करत असतात. सातार्‍यातील बहुतांश रस्त्यावर तीनचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करत रस्त्यावरच भाजीमंडई भरत असल्याचे दिसून येते. गोडोली नाका, बॉम्बे रेस्टॉरंट, पोवई नाका, मोती चौक, राजवाडा, एसटी स्टँड परिसर या ठिकाणी बहुतांश फिरते भाजी विक्रेते दिसतात. विशेष म्हणजे या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिस असूनही कारवाई होत नाही.

 उपनगरातील मंडईमध्येही समस्या

सातारा शहराचा जसजसा विततस्तार वाढत गेला. तसतशी उपनगरातील लोकसंख्या वाढत गेली. यामुळे उपनगरात ठिकठिकाणी मंडईच्या संख्येत वाढ झाली. यामुळे नागरिकांना जवळच्या जवळ भाजी खरेदीची सोय झाली. त्यामुळे कित्येक पटीने खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी या मंडईत शेतकर्‍यांची गैरसोय तर होतीच शिवाय वाहतुकीचा प्रश्‍नही ऐरणीवर येवू लागला आहे. त्यामुळे उपनगरातील ठिकठिकाणच्या या मंडई समस्यांच्या जंजाळात अडकल्या आहेत.